औरंगाबाद : राज्यभरात गेल्या दोन महिन्यांपासून शिवभोजन अंतर्गत मोफत जेवण वाटप केले जात आहे. शिवभोजन थाळीची मूळ किंमत 10 रुपये आहे पण कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन लावले होते आणि त्यामध्ये लोकांना मोफत शिवभोजन थाळी दिली जात होती.
आज मोफत शिवभोजन थाळीचा शेवटचा दिवस आहे. उद्यापासून शिवभोजन थाळीसाठी शुल्क आकारण्यात येणार आहेत. शिवभोजन अंतर्गत लॉकडाऊनमध्ये गोरगरीब जनतेला मोफत जेवण मिळत असल्याने गरीब जनतेला एक आधार होता. अनेक गरीब लोकांना गेली दोन महिने जेवणासाठी मदत झाली. आता ब्रेक द चेनचे नियम शिथिल करण्यात आल्याने आता मोफत शिवभोजन उद्यापासून बंद करण्यात येणार आहे.
घाटी जवळील शिवभोजन चालकाने अशी माहिती दिली की, “गेल्या दोन महिन्यांपासून गरीब जनतेला आम्ही मोफत जेवण देत आहोत मात्र आता सर्व लोकांना मोफत घेण्याची सवय लागली आहे. पुढेही नागरीक पैसे देण्यास कुचराई करतील म्हणून उद्यापासून शुल्क आकारण्यात येईल. आणि ज्यांना खरंच जेवणाची गरज आहे आशा गरीब जनतेला 1 महिना मोफत जेवण देण्याचा प्रयत्न करणार आहोत”.