हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । खाशाबा दादासाहेब जाधव. भारताचे पहिले ऑलिम्पिक पदक विजेते कुस्तीपटू. कोणत्याही साधनांच्या उपलब्धीविना कर्ज काढून खाशाबा ऑलिम्पिकला गेले आणि दगाफटका होऊनही कुस्तीतील पहिलं कांस्यपदक घेऊनच माघारी आले. इयत्ता नववीच्या पुस्तकात असणाऱ्या एका धड्याशिवाय त्यांची दखल आजतागायत कुणीही घेतली नाही.
खाशाबा जाधव यांचा जन्म १५ जानेवारी १९२६ रोजी साताऱ्याच्या कराड तालुक्यातील गोळेश्वर येथे झाला. घरच्या बिकट परिस्थितीतूनही संघर्ष करत त्यांनी आपली कुस्तीची आवड जोपासली. १९४८ साली झालेल्या लंडन ऑलिम्पिकमध्ये त्यांना ६ व्या स्थानावर समाधान मानावं लागलं. यानंतर मात्र त्यांनी आपला खेळ उंचावला आणि अभूतपूर्व यशाला गवसणी घातली. बारीक अंगकाठी असूनही प्रतिस्पर्ध्याला लोळवण्यात खाशाबांचा हातखंडा होता. शक्तीपेक्षा युक्तीचा वापर करुन खेळ खेळण्याकडे खाशाबांचा कल पहिल्यापासून राहिला. खेळातून निवृत्ती घेतल्यानंतर त्यांनी २७ वर्षं पोलीस दलात नोकरी केली. सेवेच्या शेवटी असिस्टंट पोलीस कमिशनर म्हणून त्यांनी निवृत्ती घेतली. क्रीडा महासंघानेही त्यांची दखल न घेतल्याने आणि पेन्शनचा विषयही रखडवल्याने त्यांना आयुष्याची शेवटची वर्षे अत्यंत हलाखीत काढावी लागली. रस्ते अपघातात त्यांचा मृत्यू झाल्याची जास्त दखलही कुणीच घेतली नाही. त्यांना आतापर्यंत फक्त अर्जुन पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे.
महाराष्ट्राला लाभलेली कुस्तीपरंपरा अवघ्या जगात चर्चेचा विषय असताना खाशबांची झालेली उपेक्षा ही नक्कीच त्रासदायक आहे. ऑलिम्पिक पदक मिळवलेलं असताना पद्म पुरस्कार न मिळालेले खाशाबा हे एकमेव भारतीय खेळाडू आहेत. यंदाच्या त्यांच्या स्मृतीदिनी त्यांच्या कार्याचा यथोचित सन्मान केला जाईल हीच आशा..!!