टीम, HELLO महाराष्ट्र | आपल्या लाडक्या गणपतीचं अवघ्या काही दिवसातच आगमन होणार आहे. गणपती बाप्पाची सर्वजण अतिशय आतुरतेने वाट पाहत आहे. काहीजण घरात गणपतीची स्थापना करतात. तर काही सार्वजनिक ठिकाणी करतात आणि काही नागरिक तर गणेशोत्सवामध्ये आपल्या भागातील गणपतींच्या दर्शनाला जातात. त्यामुळे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आम्ही तुम्हाला भारतातील प्रसिद्ध गणपतीबद्दल माहिती सांगणार आहोत.
१) सिद्धीविनायक गणपती, मुंबई :
पहिला गणपती हा मुंबईतच विराजमान झाला आहे. भारतात गणपतींपैकी सिद्धीविनायक हा पहिल्या स्थानावर आहे. या ठिकाणी दररोज लाखो भक्त दर्शनाकरता येतात. मुंबईतील हे मंदिर अनेकांच्या आकर्षणाचं ठिकाण आहे.
२) दगडूशेठ हलवाई गणपती, पुणे :
पुण्यातील दगडूशेठ हलवाई मंदिरातील गणपतीची अनेक भक्त मनोभावे पूजा करतात. या गणरायाच्या दर्शनासाटी भाविक देशभरातून येतात. या मंदिरातील ट्रस्ट हे देशातील सर्वात श्रीमंत ट्रस्टपैकी एक मानली जातते. या मंदिराला श्रीमंत दगडूशेठ नावाच्या एका हलवाईने बनवलं होतं. त्यांच्याच नावावरून गणपतीला हे नाव ठेवण्यात आलं आहे.
३) कनिपकम विनायक मंदिर, चित्तूर :
हे मंदिर आंध्रप्रदेशातील चित्तूर जिल्ह्यातील तिरूपती मंदिरापासून 75 किमी दूर आहे. हे मंदिर आपल्या प्राचीन ऐतिहासिक शिल्प आणि कलांमुळे प्रसिद्ध आहे. या ठिकाणी दर्शनाला येणारे भाविक मंदिरातील कुंडात आंघोळ करतात. भाविकांची अशी आस्था आहे की, येथे आंघोळ करून सर्व पाप धुतले जातात.
४) मनकुला विनायक मंदिर, पुडुचेरी :
भारतातील सर्वाधिक प्राचीन मंदिरापैकी हे एक मंदिर 1666 साली बांधण्यात आलं आहे. त्याकाळी पुडुचेरी फ्रान्सच्या अधिपत्याखाली होतं. या मंदिराबाबत अशी आख्यायिका आहे की, या मंदिरातील गणरायाची मूर्ती ही कुणी तरी समुद्रात फेकली होती. मात्र ती त्याच ठिकाणी प्रकट झाली.
५) मधुर महागणपती मंदिर, केरळ :
दहाव्या शताब्दीमध्ये बांधलेलं हे मंदिर अतिशय प्राचीन असून मधुवाहिनी नदीच्या किनाऱ्यावर आहे. असं म्हटलं जातं की, या मंदिरातील गणेश मूर्ती ही मातीची ही नाही आणि कोणत्या दगडाची देखील नाही. ही एका वेगळ्याच तत्वापासून बनवलेली मूर्ती आहे. इथे गणपतीच्या मूर्तीसोबतच शिवाची मूर्ती देखील आहे.
६) रणथंबौर गणेश मंदिर, राजस्थान :
वाईल्ड लाईफ पसंत असलेले लोकं रणथंबौर नॅशनल पार्क फिरायला येतात. मात्र इथे येणाऱ्या गणेश भक्तांची संख्या देखील काही कमी नाही. भक्तगण येथील ‘त्रिनेत्र’ स्वरूपातील गणरायाचं दर्शन घेतात. जवळपास 1000 वर्षे जुनं गणेश मंदिर रणथंबौरच्या किल्ल्यात सर्वात उंच ठिकाणी आहे.
७) मोती डूंगरी गणेश मंदिर, जयपूर :
जयपुरच्या सेठ जय राम पालीवाल यांनी 18 व्या शताब्दीमध्ये हे मंदिर बांधल आहे. हे मंदिर छोट्याश्या डोंगरावर असून जयपूर मधील मुख्य टूरिस्ट स्पॉट आहे.
८) गणेश टॉक मंदिर, गंगटोक :
गंगटोकच्या प्रसिद्ध टूरिस्ट स्पॉटवरील हे मंदिर सुंदर लोकेशनमुळे लोकप्रिय आहे. बौद्ध धर्माच्या अनुयायांच्या या ठिकाणचं हे गणपती मंदिर पर्यटकांच खास आकर्षणाचं कारण आहे.
९) गणपती मंदिर, रत्नागिरी :
या मंदिरातील भगवान गणेशाची मू्र्ती ही उत्तर दिशेत असून मूर्तीचं मुख पश्चिमेकडे आहे. तेथील स्थानिकांच असं म्हणणं आहे की, ही मूर्ती कुणी स्थापन केली नसून ती स्वतः दगडात प्रकट झाली आहे.
१०) उच्ची पिल्लयार मंदिर, तामिळनाडू :
भारतातील गणेश मंदिरापैकी उच्ची पिल्लयार मंदिर हे एक प्रसिद्ध गणेश मंदिर आहे. तामिळनाडू तिरूचिरापल्ली नावाच्या ठिकाणी उंच डोंगरावर हे मंदिर आहे. उंच डोंगरावर असलेला हा गणपती अतिशय सुंदर आणि मोहक वाटतो.