हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नुकतीच एप्रिल महिन्यास सुरुवात झाली आहे. एप्रिल आणि मे महिना म्हंटल की, प्रत्येकजण उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी नियोजन करण्यास सुरवात करतो. कुणी थंड हवेच्या ठिकाणी फिरायला जातात तर समुद्रकिनारी. तुम्हीही कुठे फिरायला जायचं प्लॅनिंग करत असाल तर तुमच्यासाठी सातारा जिल्ह्यातील अशी काही ठिकाणे आहेत कि तिथे तुम्ही भरपूर एन्जॉय करू शकता.
सातारा हे शहर पश्चिम महाराष्ट्रात येते, हे एक ऐतिहासिक वारसा लाभलेले आणि सर्वात जास्त सैनिक असलेले जिल्ह्याचे ठिकाण आहे. सातारा हे शहर मराठा साम्राज्याची राजधानी होती. सातारा हे नाव शहराला वेढलेल्या सात पर्वतांमुळे (सात-तारा) दिले गेले. शहराच्या मध्यभागी सातार्यात दोन राजवाडे आहेत, जुना राजवाडा आणि नवा राजवाडा हे दोन्ही राजवाडे एकमेकांना लागूनच आहेत.
1) आर्थर सीट पॉईंट (Arthur’s Seat Point)
सर आर्थर मालेट या इंग्रज अधिकाऱ्याने या Point चा शोध लावला होता आणि त्याच्याच नावावरून Arthur’s Seat Point ला ओळखले जाते. महाबळेश्वरमध्ये आपण ज्या अनेक ठिकाणी भेट देऊ शकता त्यापैकी Arthur’s Seat Point हे सर्वात प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. तसेच पॉइंट्सची राणी किंवा मादी महल म्हणून ओळखले जाते. आर्थरसीट 1470 मीटर उंच आहे आणि महाबळेश्वर मार्केटपासून ते 13 किलोमीटर अंतरावर आहे.
2) तापोळा (Tapola)
पश्चिमेस ‘मिनी काश्मीर’ असे नाव असलेले, तापोळा हे एक छोटेसे गाव आहे, जे भव्य शिवसागर तलावासाठी प्रसिद्ध आहे. नोकाविहार, पाणबुडीचा खेळ आणि तलावामध्ये पोहणे आदी या ठिकाणी करता येऊ शकते. तापोळ्याच्या दाट जंगलात स्ट्रॉबेरीची शेती पहायला मिळते.
3) पाचगणी (Panchgani)
पाचगणी हे सातारा जिल्ह्यातील व महाराष्ट्रातील एक प्रमुख हिल स्टेशन आहे. जे 1334 मीटर उंचीवर आहे. महाराष्ट्रातील सर्वात थंड आणि लोकप्रिय पर्यटन स्थळांच्या यादीत समाविष्ट असलेले ठिकाण आहेत. नयनरम्य दृश्यांसाठी पाचगणी ओळखली जाते. ब्रिटिश काळात उन्हाळी रेसॉर्ट म्हणून याला वापरले जात होते. सह्याद्री पर्वताच्या पाच टेकड्या मुळे महाराष्ट्रातील या पर्यटन स्थळाला पाचगणी असे नाव देण्यात आले. पाचगणीच्या उंचीवरून तुम्हाला कमलगड किल्ला आणि धाम धरण तलाव चे मनमोहक दृश्य पाहायला मिळते. यातच आता पर्यटन स्थळ निसर्ग प्रेमीसाठी जणू स्वर्गच आहे.
4) मायणी पक्षी अभयारण्य (Mayni Bird Sanctuary)
इतर सर्व सुप्रसिद्ध सातारा पर्यटन स्थळांसह, जर तुम्हाला पक्ष्यांचे निरीक्षण करायचे असेल तर तुम्ही मायणी पक्षी अभयारण्याला भेट दिली पाहिजे. ब्रिटीश साम्राज्यात निर्माण झालेल्या या अभयारण्यात पक्ष्यांच्या 400 पेक्षा जास्त प्रजाती आढळू शकतात. विविध वनस्पती आणि जीवजंतूंचा अभ्यास करण्यासाठी पक्षीशास्त्रज्ञ नियमितपणे भारतातील सर्वात प्रसिद्ध पक्षी अभयारण्यांपैकी एक असलेल्या मायानी येथे प्रवास करतात. येथे अनेक औषधी आणि वनौषधी वनस्पतीही मुबलक प्रमाणात फुललेल्या आहेत.
5) अंजिक्यतारा किल्ला (Anjikyatara Fort)
सातारा जिल्ह्याच्या अगदी मध्यभागीच हा किल्ला आहे. 3 हजार 300 फूट उंच असलेल्या अजिंक्य पर्वतावर हा किल्ला आहे. या किल्ल्यावर जुनी पाणपोईसुद्धा आहे. यवतेश्वरच्या पर्वतावरुनही तुम्हाला हा अभेद्य किल्ला दिसू शकतो. या किल्ल्यावरच मंगलाई देवीचं मंदिरही आहे. तसंच हनुमान आणि शंकराचंही मंदिर किल्ल्यावर आढळतं. एवढंच नव्हे तर टेलिव्हिजन आणि रेडिओचे टॉवर्सही या किल्ल्यावर आहेत.
6) कोयना अभयारण्य (Koyna Sanctuary)
पश्चिम महाराष्ट्रातील सर्वाधिक घनदाट जंगल म्हणून या कोयना अभयारण्यकडे पाहिलं जातं. 463 किमी क्षेत्रफळावर पसरलेल्या या अभयारण्य शिवसागर जलायशयाच्या कडेकडेने वसलेलं आहे. 1985 साली या जागेला अभयारण्याची मान्यता मिळाली. अनेक प्रकारचे वन्यजीव आपल्याला इकडे सापडतात. साबंर, भेकर आणि पिसोरी हे हरणाचे प्रकार इकडे आहेत तर, माकडं, कोल्हे, खोकड, ऊदमांजरे, साळिंदर, रानससे, अस्वल, बीबटेआदी हिंस्र प्राणीही इकडे आढळतात. पूर्वी या प्राण्यांपासून बचाव करण्यासाठी पर्यटक फटाके फोडत असत. मात्र नंतर फटाके फोडण्यास बंदी करण्यात आली. वासोटा, जंगली जयगड, मधुमकरंदगड आदी किल्ले या अभयारण्यात आढळतात.
7) वाई (Wai)
सातारा जिल्ह्यातील वाई तालुकाही पर्यटनाच्या दृष्टीने समृद्ध आहे. कृष्णा नदीच्या काठावर दक्षिण काशी म्हणून वाई हे विख्यात धार्मिक क्षेत्र आहे. कृष्णा नदीवर अनेक घाट व प्राचीन मंदिरे आहेत. ढोल्या गणपती मंदिरामुळे वाईची प्रसिध्दी वाढली आहे. गणपती आळीच्या घाटावर कृष्णा तीरी हे वाईतील सर्वात मोठे व भव्य मंदिर पेशव्यांचे सरदार गणपतराव भिकाजी रास्ते यांनी बांधले. गाभाऱ्यात गणपतीची पाषाणाची 6 फूट उंच व लांबी 7 फूट अशी बैठी मूर्ती आहे. मंदिराच्या भव्य सभागृहाच्या तिन्ही बाजूंनी कमानी आहेत. गणपती मंदिराजवळ काशिविश्वेश्वर शंकराचे मंदिर आहे.