फलटण | अलगुडेवाडी (ता. फलटण) येथे घराकडे जाण्यासाठी पक्का रस्ता नसल्याने त्याचे ग्रामपंचायतीमध्ये संमतीपत्र मंजूर करण्याच्या हेतूने दोन हजार रुपयांची लाच स्वीकारल्या प्रकरणी तहसील कार्यालयातील अव्वल कारकून आणि त्याच्या साथीदारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, की अलगुडेवाडी येथील तक्रारदार यांच्या घराकडे जाण्यासाठी पक्का रस्ता नसल्याने रस्ता हवा असल्यास ग्रामपंचायत दप्तरी नोंद करून लोकांची काही हरकत नसल्याचे प्रतिज्ञापत्र / संमतीपत्र तयार करून देण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी फलटण तहसील कार्यालयातील अव्वल उपवन आणि सध्या संजय गांधी
निराधार योजनेत कार्यरत असलेला पांडुरंग नामदेव जाधव तथा पी. एन. जाधव (वय- 53) व त्याचा सेतूमध्ये कार्यरत साथीदार अरुण सदाशिव सपकाळ (वय- 53, रा. काळुबाईनगर फलटण) यांच्यावर काल सायंकाळी सहाच्या सुमारास तहसील कार्यालयाच्या आवारातील सेतू कार्यालयासमोर सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करून त्यांच्याविरुद्ध फलटण शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई लाचलुचपत विभागाचे पोलिस अधीक्षक राजेश बनसोडे, अतिरिक्त अधीक्षक सूरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपधीक्षक सुजय घाटगे, पोलिस निरीक्षक सचिन राऊत, विक्रम पवार यांच्या पथकाने केली. याबाबत गुन्हा फलटण शहर पोलिस ठाण्यात नोंद झाला आहे.