सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
खंडाळा तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून एप्रिल 2018 मध्ये अत्याचार वारंवार अत्याचार केले. याप्रकरणी अंदोरीच्या युवकावर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. न्यायालयाने या गुन्ह्यात युवकाला दहा वर्षांची सक्तमजुरी व दंड अशी शिक्षा सुनावणी आहे. नितीन अर्जुन जाधव (वय 28, रा. अंदोरी, ता. खंडाळा) असे शिक्षा सुनावलेल्या आरोपीचे नाव आहे. नितीन हा 30 मार्च 2018 ते 29 एप्रिल 2018 या कालावधीत तालुक्यातीलच एका गावामध्ये रहावयास होता. या कालावधीत त्याच गावातील अल्पवयीन मुलीवर त्याने वारंवार अत्याचार केले होते.
सदरची बाब मुलीने तिच्या मामाला सांगितल्यानंतर मामाने नितीन जाधव याच्याविरोधात लोणंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचा तपास सपोनि एस. के. कुटे यांनी केला होता. तर सपोनि गणेश पवार यांनी या प्रकरणाचे चार्जशीट न्यायालयात दाखल केले होते. हा गुन्हा गंभीर स्वरुपाचा असल्याने पोलीस उपअधिक्षक तानाजी बरडे व सपोनि विशाल वायकर यांनी विशेष लक्ष पुरवले.
सरकारी वकील अॅड. मुके यांनी पीडित मुलीच्या बाजूने युक्तिवाद केला. हा युक्तिवाद ग्राह्य धरून नितीन जाधव याला न्या. पटणी यांनी 10 वर्षे सक्तमजूरी व 5 हजारांचा दंड आणि दंड न दिल्यास तीन महिने साधी कैद अशी शिक्षा सुनावली आहे. सरकारी वकीलांना पोलिस प्रॉसिक्यूशन स्कॉडचे उपनिरीक्षक राजेंद्र यादव, हवालदार शमशुद्दीन शेख, जी. एच. फरांदे, अश्विनी घोरपडे व लोणंद पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक जी. जी. माने व पैरवी अधिकारी अडसूळ यांनी सहकार्य केले.