नवी दिल्ली । आठवडयाभरापासून राजकीय वादळ निर्माण करणाऱ्या तिन्ही कृषी विधेयकांवर रविवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वाक्षरी केली. त्यामुळे कृषी क्षेत्रातील बदलांचे कायदे प्रत्यक्षात अस्तित्वात आले आहेत. मात्र, यानंतर देशभरातील शेतकऱ्यांमध्ये रोष व्यक्त केला जात आहे. शेतकरी रस्त्यावर उतरून या कृषी विधेयकांना विरोध करत आहेत. कृषी विधेयकावरुन सुरु असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. सोमवारी सकाळी नवी दिल्लीत इंडिया गेटवर ट्रॅक्टर पेटवून देण्यात आला.
#WATCH: Punjab Youth Congress workers stage a protest against the farm laws near India Gate in Delhi. A tractor was also set ablaze. pic.twitter.com/iA5z6WLGXR
— ANI (@ANI) September 28, 2020
राजपथवर कृषी विधेयकावरुन आंदोलन सुरु असताना पंजाब युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हा ट्रॅक्टर पेटवून दिला. सकाळी ७ वाजून ४२ मिनिटांनी इंडिया गेटवर ट्रॅक्टरला आग लावण्यात आल्याची माहिती मिळत आहे. आग विझवण्यासाठी ग्निशमन दलाच्या दोन गाडया तात्काळ घटनास्थळी रवाना झाल्या होत्या. “इंडिया गेटवर १५ ते २० जण जमले व त्यांनी ट्रॅक्टर पेटवून दिला. आग विझवण्यात आली असून, ट्रॅक्टर तिथून हटवण्यात आला आहे. जे यामध्ये सहभागी आहेत, त्यांची ओळख पटवण्यात आली असून तपास सुरु आहे” असे नवी दिल्लीच्या डीसीपींनी सांगितले.
दरम्यान, कृषी विधेयकांना उत्तर भारतात विशेषकरून हरियाणा आणि पंजाब राज्यात तीव्र विरोध होत आहे. राष्ट्रपतींनी कृषी विधियेकांवर स्वाक्षरी केली असून हा शेतकऱ्यांसाठी ‘काळा दिवस’ असल्याची संतप्त प्रतिक्रिया भाजपची साथ सोडलेल्या शिरोमणी अकाली दलाने व्यक्त केली. याशिवाय कृषी विधेयकावरुन मतभेद झाल्यामुळे शिरोमणी अकाली दलने शनिवारी रात्री उशिरा एनडीएमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीसाठी हा एकप्रकारचा झटका आहे. कारण मागच्या २२ वर्षांपासून हा पक्ष भक्कमपणे भाजपासोबत होता.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.