सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
बारामती आणि फलटण तालुक्याच्या सीमेवर असलेल्या कऱ्हा नदीच्या पाण्यात पडलेल्या कुटुंबाला वाचविण्यासाठी गेलेल्या युवकाचा बुडून मृत्यू झाला आहे. शुभम संतोष भिसे असे या मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नांव आहे. महाबळेश्वर मधील रेस्क्यू टीमच्या पथकाने पाण्यातून युवकांचा मृतदेह बाहेर काढलास आहे.
घटनास्थळावरून मिळालेली माहीती अशी, बारामती आणि फलटण तालुक्याच्या सीमेवर असलेल्या कऱ्हा नदीच्या पाण्यात रविवारी सायंकाळी युवकाचा बुडून मृत्यू झाला आहे. एक कुटुंब पती -पत्नी आणि लहान मुलगी मोटारसायकल वरून कऱ्हा नदीच्या बंधाऱ्यावरून रविवारी सायंकाळी बारामतीवरून फलटण तालुक्यातील कांबळेश्वरकडे जात होते. मोटारसायकलसह तिघेही पाण्यात पडले. पाण्यात पडलेल्या कुटुंबाला वाचवण्यासाठी कांबळेश्वर मधील तीन तरुणांनी पाण्यात उड्या घेतल्या आणि पाण्यात पडलेल्या तीन जणांना वाचवले.
मात्र वाचवायला गेलेल्या तीन पैकी एकजण बुडाला, शुभम संतोष भिसे असे या तरुणाचे नांव आहे. रविवारी सायंकाळी फलटण पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने त्याचा मृतदेह शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र तो अयशस्वी ठरला. अखेर फलटण पोलिसांना महाबळेश्वर येथील रेस्क्यू टीमला पाचारण करावे लागले. या टीमने आज बुडालेल्या युवकाचा मृतदेह पाण्यातून शोधून बाहेर काढला आहे. युवकांच्या मृत्यूच्या दुर्दैवी घटनेमुळे बारामती फलटण तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे..