सातारा | दिवाळीच्या सणानिमित्त घरावर लाईटच्या माळा लावताना पतीला वीजेचा शाॅक लागल्याने पतीला वाचविताना पत्नी आणि त्यांची दोन्ही मुले गंभीररीत्या भाजून जखमी झाली आहेत. तर या दुर्देवी घटनेत पतीचा मृत्यू झाला आहे. सदरील घटना साताऱ्यातील मोरे कॉलनीत शनिवारी रात्री उशिरा घडली. सुनील तुकाराम पवार (वय- 42) असे शाॅक लागून मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, मोरे काॅलनीतील सुनील पवार हे दिवाळीसाठी घरावर विद्युत रोषणाई करत होते. शनिवारी सायंकाळी घराच्या दुसऱ्या मजल्यावर लाईटच्या माळा लावत होते. त्यांच्या घराजवळूनच वीज वितरणची मुख्य लाइन गेली आहे. या लाइनच्या तारेला सुनील पवार यांचा चुकून हात लागला. पतीला शाॅक लागल्याचे लक्षात येताच पत्नी मनिषा यांनी त्यांना ओढण्याचा प्रयत्न केला तेंव्हा त्यानांही शाॅक लागला. त्यांची दोन्ही मुले श्रवण आणि ओम हेसुद्धा आई वडिलांच्या मदतीसाठी धावून आले असता त्यांनाही विजेचा जोरदार धक्का बसला.
विजेचा शाॅक बसल्याचा प्रकार लक्षात आल्यानंतर आजूबाजूच्या नागरिकांनी त्यांना तत्काळ साताऱ्यातील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच सुनील पवार यांचा मृत्यू झाला. तर त्यांची पत्नी मनिषा आणि मुले श्रवण, ओम यांच्यावर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तत्काळ उपचार सुरू केले आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे पोलिसांनी सांगितले. सातारा तालुका पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी रात्री उशिरापर्यंत घटनास्थळाचा पंचनामा करत होते.