नाशिक प्रतिनिधी । आज शुक्रवारी पारंपरिक पद्धतीने महामृत्युंजय भगवान त्र्यंबकराजाची पालखी काढण्यात आली. पालखी मेनरोडमार्गे लक्ष्मीनारायण चौक, पाच आळीतून त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या दारासमोरून येऊन पालखीचे औक्षण स्वीकारले. कुशावर्तावर स्नानपूजा, आरती होऊन नेहमीच्या परतीच्या पारंपरिक मार्गाने पालखी पुन्हा मंदिरात आणली गेली. या पालखी सोहळ्यात भाविक मोठ्या संख्येने सामील झाले होते.
महाशिवरात्रीनिमित्त केलेल्या आकर्षक विद्युत रोषणाईमुळे त्र्यंबकेश्वर मंदिर परिसर प्रकाशात न्हाहून निघाला आहे. महाशिवरात्रीनिमित्त तीन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन त्र्यबकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीनं करण्यात आले आहे. शुक्रवारी सायंकाळी भरत नाट्यम नृत्य तसेच सुप्रसिद्ध गायक रामेश्वर डांगे भक्ती संगीत व अभंग गायन सादर करणार आहेत. शनिवारी कथक नृत्याचा कार्यक्रम आयोजित केला आहे.
दरम्यान महाशिवरात्रीनिमित्त भाविकांची दर्शनासाठी येणारी गर्दी लक्षात घेता भाविकांना गर्भगृहात प्रवेशबंदी करण्यात आली आहे. एकाचवेळी अनेक भाविक आत घुसले तर गर्भगृहाचा दरवाजा बंद होऊन अनुचित प्रकार घडू नये म्हणून शुक्रवारी भाविकांना सकाळपासून तर मंदिर बंद होईपर्यंत गर्भगृह बंद ठेवण्याचा निर्णय त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतला. यासाठी भाविकांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्र्यंबकेश्वर देवस्थान विश्वस्त मंडळ व त्र्यंबकेश्वर पोलिसांनी केले आहे.
ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.