सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे
आपल्या जिवलग मित्राला आलेल्या अकाली निधनाने त्याच्या कुटुंबावर पसरलेला दुःखाचा डोंगर दूर करण्यासाठी त्यांचे जिवलग मित्र सरसावून आले. शिक्षक असलेल्या मित्रावर असणारा कर्जाचा डोंगर पैसे गोळा करून फेडला. आजच्या जमान्यात माणुसकी दाखवून देणाऱ्या मित्रांची हि अनोखी कहाणी.
मिरज तालुक्यातील बेळंकी येथील राजू सातपुते हे एक आदर्श प्राथमिक शिक्षक होते. हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचे आकस्मिक निधन झाले. त्यांच्या घरची आजही परिस्थिती हालाखिची आहे. आपलं स्वतःच घर असावं असं स्वप्न उराशी बाळगलेल्या राजूंनी बँकेचे कर्ज घेऊन छोटेसे घर बांधले. पण नियती निष्ठूर झाली आणि काळाने त्यांना ओढून नेले. या कुटूंबाचा एकमेव आधार राजूच होते. कुटुंबाचे उत्पन्नाचे कोणतेही साधन नसल्यामुळे त्याच्या जाण्याने हे कुटूंब निराधार झाले. रक्षाविसर्जनानंतर त्यांच्या मित्रांनी बँकेतील कर्जाची चौकशी केली. १३ लाख ६८ हजार रुपयांचे कर्ज फेडण्यासाठी कोणतेही कुटुंबीयांकडे साधन नव्हते. यावेळी त्यांच्या शिक्षक मित्रांनी राजूच्या कुटूंबाला कर्जमुक्त करुनच श्रध्दांजली वाहू असा निर्धार केला.
‘राजू सातपुते मदतनिधी’ नावाने व्हॉटस अप ग्रुप तयार केला आणि सर्वांना मदतीचे आवाहन केले. या आवाहनाला लोकांनीही भरभरुन मदत केली. राजूंच्या प्रथम पुण्यस्मरणा आधी राजूच्या कुटूंबाला कर्जमुक्त करायचा निर्धार केला. परिसरातील संस्था आणि संवेदनशील ५२५ दानशूर व्यक्तींनी, शिक्षक संघटनेने या कामी मदत केली. २९ मे २०१९ रोजी प्रथम पुण्यस्मरणा दिनी त्यांच्या मित्र परीवाराने या मित्राला कर्जमुक्त करुनच आपल्या लाडक्या मित्राला श्रध्दांजली वाहिली. या दिवशी सर्वांनी मदत केल्यामुळेच कुटूंबाला खरा आधार मिळाल्याची भावना कुटूंबियांनी व्यक्त करताना त्यांनाही अश्रुंचा बांध आवरता आला नाही.