सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
पुणे- बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर रात्री उशिरा बॉम्बे रेस्टॉरंट चौकात उड्डाण पुलावर झालेल्या अपघातात ट्रक चालक केबिनमध्येच अडकून राहिले. तब्बल तासभर अडकलेल्या चालकांना बाहेर काढण्यासाठी क्रेन मागवावी लागली. पोलिसांच्या सहकार्याने क्रेनने चालक बाहेर काढून त्याच्यावर सध्या शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, सांगलीहून- पुण्याकडे निघालेल्या ट्रक चालकाचा अचानक ताबा सुटल्यामुळे ट्रक मधोमध असणाऱ्या दुभाजकाला धडकला. यावेळी पाठीमागून येणाऱ्या दुसऱ्या चालकाला स्वतःचा ट्रक नियंत्रणात न आल्यामुळे त्या ट्रकने देखील अपघातग्रस्त ट्रकला जोरदार धडक दिली. दोन्ही ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे. ट्रकच्या पुढील भागाचा चक्काचूर झाल्याने पाठीमागील ट्रकमधील चालक हा केबिनमध्ये अडकला होता. पोलिसांनी बराच वेळ चालकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला मात्र ते काही शक्य झाले नाही.
अखेर पाठीमागील ट्रकमधील चालक हा एक तास केबिनमध्ये अडकला. यावेळी सातारा पोलिसांनी क्रेनच्या मदतीने केबिनमध्ये अडकलेल्या ट्रक चालकाला सुरक्षित बाहेर काढले असून दोन्ही अपघातग्रस्त ट्रकमधील चालक हे जखमी झाले आहेत. चालकांना सातारा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक खोळंबली होती, पोलिसांनी ती काही काळाने सुरळीत केली.