कराड | पुणे- बंगळूर आशियाई महामार्गावर मालखेड (ता. कराड) गावच्या हद्दीत दुचाकीची पाठीमागून मालट्रकला धडक बसली. या अपघातात दुचाकीस्वार ठार झाला. मंगळवार (दि.29) रोजी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांसह महामार्ग देखभाल विभागाचे कर्मचारी त्वरित घटनास्थळी दाखल झाले. मदन दिलीप पवार (वय 28, रा. मालखेड, ता. कराड) असे अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
याबाबत घटनास्थळावरून व पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, मदन पवार हे महामार्गावरून कासेगावकडून मालखेडकडे येत होते. मालखेड गावच्या हद्दीत आल्यानंतर पुढे जात असलेल्या मालट्रक क्रमांक (MH-21-X-8838) दुचाकीने क्रमांक (MH-50- T- 3983) पाठीमागून धडक बसली. या अपघातात दुचाकीवरील मदन पवार हे ठार झाले. तर दुचाकीचे नुकसान झाले. अपघातानंतर रात्रीची वेळ असल्याने वाहतूकीवर परिणाम झाला होता. पोलिसांनी बॅरिगेट लावून वाहतूक सुरळीत केली.
अपघाताची माहिती मिळताच कराड तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी, कर्मचारी तसेच महामार्ग पोलीस व महामार्ग देखभाल विभागाचे कर्मचारी त्वरित घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अपघातग्रस्त वाहने रस्त्यावरून बाजूला घेऊन विस्कळीत झालेली महामार्गावरील वाहतूक सुरळीत केला. या अपघातानंतर मालखेड येथील अनेकांनी घटनास्थळावर धाव घेतली. मदन पवार यांच्या निधनाने हळहळ व्यक्त केली जात आहे.