औरंगाबाद – अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचा अहवाल लवकरात लवकर सादर करण्याचे निर्देश देत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळवुन देण्यास प्रयत्न करणार असल्याचे महसुल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयात राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतपिकांचे नुकसान, जीवतहानी तसेच देण्यात येणाऱ्या तातडीच्या उपाययोजनांबाबत आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.निलेश गटणे, अप्पर जिल्हाधिकारी डॉ.अनंत गव्हाणे, निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल आदी अधिकारी उपस्थित होते.
राज्यमंत्री पुढे म्हणाले की, अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात रस्ते, पुल यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याचा प्रस्ताव देखील सादर करावा. तसेच मुख्य रस्त्यांच्या बाजुला झालेले अतिक्रमण तात्काळ काढण्याची कार्यवाही करावी. पावसाळयाचे दिवस लक्षात घेता रोगराई टाळण्यासाठी रस्त्यावर शौचास जाणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यासाठी पथकांची नेमणुक करावी. जिल्ह्यातील तिर्थक्षेत्रांचा दर्जा वाढविण्याबाबत प्रशासनाने प्रस्ताव सादर करावा असेही निर्देश महसुल राज्यमंत्री यांनी दिले.