नाशिक | सनदी अधिकारी म्हणून आपल्या कामाची वेगळी छाप पाडलेल्या तुकाराम मुंढे यांनी नाशिक महापालिका आयुक्त पदाची धुरा हाती घेतल्या पासून धडाकेबाज कामाचा सपाटा सुरु केला आहे. स्वच्छ भारत अभियानाविषयी प्रशासन किती गंभीर आहे, याची चाचपणी करण्यासाठी मुंढे यांनी मंगळवारी अंधारातच शहरभर फेरफटका मारला. यावेळी जे वास्तव समोर आले ते पाहून स्वतः मुंढेही अवाक झाले.
मुंढे यांच्या या अचानकच्या झाडाझडतीत स्वच्छ भारत अभियानात स्थान मिळविण्यासाठी प्रशासनाकडून जोरदार तयारी नव्हे तर बकालपणा सुरू असल्याचे समोर आले. त्यात १६० सफाई कर्मचारी गैरहजर तर अनेक ठिकाणी कर्मचाऱ्यांनी सफाईसाठी रोजंदारीवर बाहेरचे लोक नेमलेले आढळले. अनेक अधिकारी यावर लक्षच देत नसल्याचा धक्कादायक प्रकार आढळला. या सगळ्यांना आयुक्तांनी ‘मुंढे’ स्टाईल शॉक दिला आहे.
नागरीक तसेच नगरसेवकांच्या अस्वच्छतेच्या प्राप्त तक्रारींची दखल घेण्यासाठी तुकाराम मुंढे यांनी शहरातील स्वच्छतेच्या कामाचा यावेळी आढावा घेतला. मात्र भल्या पहाटेच्या अंधारात केलेल्या त्यांच्या या स्टिंग ऑपरेशनमध्ये भलतेच वास्तव समोर आले. यामध्ये प्रमुख अधिका-यांनी विविध भागांत केलेल्या पाहणीत आरोग्य विभागाच्या कारभाराचे वाभाडे निघाले. त्यामुळे नगरसेवकांच्या आरोपांवर एकप्रकारे शिक्कामोर्तब झाले.
स्टिंग ऑपरेशनमध्ये सुमारे १६० कर्मचारी विनापरवानगी गैरहजर, २०७ कर्मचारी रजेवर असले, तरी त्यांची रजा मंजूर झाली की नाही याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. शहरातील सफाईचे स्टिंग ऑपरेशन केल्यानंतर आयुक्त मुंढे यांनी सहा विभागीय अधिका-यांची हजेरी घेतली.
फिरण्यासाठी वेळ मिळत नसल्याचे उत्तर मिळाल्याने आयुक्त मुंढे यांनी नोटिसा बजावण्याचे आदेश दिले. घनकचरा व्यवस्थापक डॉ. सचिन हिरे यांच्या विभागीय चौकशीचे आदेश दिल्याचे समजते. एकतीस प्रभागांत एकाचवेळी केलेल्या या स्टिंग ऑपरेशनमध्ये अनेक धक्कादायक प्रकार उघड झाले. प्रभाग २३ मध्ये बाहेरच्या व्यक्तीकडून सफाई सुरु होती.
त्यांना सफाई कर्मचाऱ्याने रोजंदारीवर नेमल्याचे आढळले. अनेक कर्मचारी पाच ते सहा महिन्यांपासून गायब होते. प्रत्येक हजेरी शेडवर निम्म्यापेक्षा अधिक कर्मचारी गैरहजर होते. कर्मचा-यांकडे सुरक्षेची साधने नव्हती. महापौरांच्याच प्रभागात पाच दिवसांपासून घंटागाडी गायब असल्याची धक्कादायक बाब आढळली.