Tur Purchase : शेतकऱ्यांना खुशखबर!! तूर खरेदीला मुदतवाढ, सरकारचा मोठा निर्णय

Tur Purchase
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Tur Purchase। राज्यातील तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. केंद्रातील मोदी सरकारने तूर खरेदीला मुदतवाढ दिली आहे.
तूर उत्पादक शेतकरी व लोकप्रतिनिधी यांची मागणी लक्षात घेता पीपीएस अंतर्गत नाफेड आणि एनसीसीएफ यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या तूर खरेदीस आता केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने 28 मे 2025 पर्यंत मुदत वाढवून दिली आहे. राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी याबाबत माहिती दिली आहे. केंद्र सरकारने दिलेल्या मुदतवाढीमुळे ज्या शेतकऱ्यांनी अद्याप तूर विकली नाही, त्यांना हमीभावाचा लाभ घेण्याची संधी मिळणार आहे.

खरं तर राज्यात तूर खरेदीची (Tur Purchase) मुदत 13 मे 2025 पर्यंतच देण्यात आली होती. तूर उत्पादक शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेता तूर खरेदीची मुदत वाढवून द्यावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस आणि पणन मंत्री जयकुमार रावल यांनी केंद्र सरकारकडे केली होती. तसा प्रस्ताव पणन विभागाकडून केंद्रीय कृषी आणि कल्याण मंत्रालयाला पाठविण्यात आला होता. या मागणीची दखल घेत ही मुदत 28 मे 2025 पर्यंत वाढवून देण्यात आली आहे.

सध्या बाजारात तुरीचे दर कमी- Tur Purchase

केंद्र सरकारने राज्याला सन 2024-25 हंगामात पीपीएस अंतर्गत 2 लाख 97 हजार 430 मेट्रिक टन तूर खरेदीला मंजुरी दिलेली आहे. त्याकरिता नाफेड व एनसीसीएफ या केंद्रीय नोडल संस्थांच्या माध्यमातून राज्यातील आठ राज्यस्तरीय नोडल संस्थांमार्फत 764 खरेदी केंद्र राज्यात कार्यान्वित आहेत. महाराष्ट्रात आतापर्यंत १,३७,४५८ शेतकऱ्यांनी तूर खरेदीसाठी ऑनलाइन नोंदणी केली आहे. १३ मे २०२५ पर्यंत ६९,१८९ शेतकऱ्यांकडून १,०२,९५१ मेट्रिक टन तूर खरेदी झाली आहे. सध्या बाजारात तुरीचे दर कमी असल्याने हमीभावाचा मोठा फायदा शेतकऱ्यांना होत आहे. यासाठी उर्वरित शेतकऱ्यांची तूर हमीभावाने खरेदी होण्यासाठी तूर खरेदीला मुदतवाढ मिळावी, अशी मागणी केंद्र सरकारकडे करण्यात आली होती, अखेर केंद्राने शेतकऱ्यांची मागणी मान्य केल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.