संसदेत इस्रायल-हमास संघर्षावर भाष्य करताना तुर्कीच्या खासदाराला हृदयविकाराचा झटका!

Hasan Bitmez
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| मंगळवारी तुर्की संसदेमध्ये इस्रायल- हमास संघर्षासंदर्भात तुर्कीच्या कृतींवर टीका करताना 53 वर्षीय खासदार हसन बिटमेझ यांना हृदयविकाराचा झटका आल्याची घटना घडली. तुर्कीमध्ये संसदीय अधिवेशना दरम्यान बोलत असताना हसन बिटमेझ अचानक जमिनीवर कोसळले. यामुळे संसदेमध्येही गोंधळ उडाला. पुढे, हसन बिटमेझ यांची आरोग्य तपासणी करण्यात आल्यानंतर त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले.

समोर आलेल्या माहितीनुसार, मंगळवारी संसदेत सुरू असलेल्या अधिवेशनावेळी खासदार हसन बिटमेझ यांनी इस्रायल-हमास संघर्षावर भाष्य केले. यावेळी बोलताना त्यांनी, “आपण कदाचित आपल्या विवेकापासून सर्व गोष्टी लपवू शकतो, परंतु इतिहासापासून काहीच लपून राहू शकत नाही. तसेच आपण देवाच्या क्रोधापासूनही वाचू शकणार नाही” असे म्हणले. त्यानंतर काही सेकंदामध्येच हसन बिटमेझ जमिनीवर कोसळले आणि त्यांची प्रकृती बिघडली. यावेळी अधिवेशनाचे थेट प्रक्षेपण देखील सुरू होते.

या सर्व घटनेनंतर हसन बिटमेझ यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यानंतर, त्यांची प्रकृती गंभीर आहे, तसेच त्यांना हृदयविकाराचा झटका आला असल्याची माहिती तुर्कीचे आरोग्य मंत्री फहरेटिन कोका यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली. दरम्यान, या सर्व घटनेमुळे संसदीय कामकाजात गोंधळ उडाला होता. त्याचबरोबर बिटमेझ यांच्या प्रकृतीविषयी चिंता व्यक्त करण्यात येत होती. मात्र आता त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.