कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
मोबाईल, इंटरनेट, टीव्ही काळाची गरज म्हणून प्रत्येक घरात पोचली. परंतु या तंत्रज्ञानाच्या नकारात्मक बाबीचां समाजात अतिरेकी झाला आहे. यामुळे आपली संस्कृती आणि नाती संपलीच शिवाय माणसाचे मानसिक व शारीरिक नुकसानही खूप मोठे झाले. त्यामुळे हे कुठेतरी थांबले पाहिजे. यासाठी वहागाव ग्रामपंचायतीने याबाबत पुढाकार घेत विशेष ग्रामसभा घेतली. ग्रामसभेत मोबाईल, इंटरनेट आणि टीव्हीचा वापर दोन तासाठी पुर्णपणे बंद करून लॉकडाऊन करण्याचा क्रांतिकारक निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता वहागामध्ये दररोज सायंकाळी 6. 30 वाजता भोंगा वाजणार अन् दोन तासासाठी मोबाईल, टीव्ही अन् इंटरनेट बंद होणार आहे.
वहागाव ग्रामपंचायती कडून सोमवारी संध्याकाळी मोबाईल इंटरनेट आणि टीव्ही यामुळे भविष्यात होणारे दुष्परिणाम, त्याचे फायदे व तोटे यावर सरपंच संग्राम पवार यांच्या अध्यक्षतेखाली विशेष ग्रामसभा घेण्यात आली. यावेळी ग्रामसभेत सरपंच संग्राम पवार म्हणाले मोबाईल, इंटरनेट आणि टीव्ही याचे महत्त्व प्रत्येकाच्या जीवनात अधोरेखित झाले आहे. परंतु या सोशल मीडियाच्याही दोन बाजू आहेत. एक सकारात्मक आणि दुसरी नकारात्म, दुर्दैवाने नकारात्मक बाबीवरच सध्या वाटचाल चालू आहे. यामुळे समाजविघातक शक्तींचा, संकटाचा सर्वांनाच त्रास होत आहे. यामुळे आपण सर्वांनी सर्वप्रथम मोबाईल, इंटरनेट आणि टीव्ही याचा वापर करण्याची आचारसंहिता घालावी लागणार आहे. तरच उद्याची पिढी सुंस्कृत आणि सुशील निर्माण होईल.
यावेळी ग्रामसभेत दररोज सायंकाळी 6:30 ते 8:30 या वेळात मोबाईल, टीव्ही, इंटरनेट बंद करण्याचा ठराव एकमुखाने घेण्यात आला. त्यामुळे उद्यापासून रोज सांयकाळी 6:30 वाजता ग्रामपंचायतीतुन भोंगा वाजवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. यावेळी उपसरपंच शिला पवार, ग्रामपंचायत सदस्य सुजाता पुजारी, रंजना पवार, आनंदी पवार, धनंजय पवार, संतोष कोळी, हनुमंत पवार, तंटामुक्ती अध्यक्ष जनार्दन पवार, तुकाराम जाधव, संचालक सुभाष पवार, दीपक पवार, अनिकेत पवार, राजेंद्र पवार, हरिदास पवार वहागांव मधील ग्रामस्थ, शालेय विद्यार्थी उपस्थित होते.