औरंगाबाद | वाळूज जवळील रहदारीच्या नगर रोडवर पहाटेच्या सुमारास ट्रक चालकाला मारहाण करीत चौघा जणांनी लोखंडी गजाचा ट्रक पळून नेला. ही घटना बुधवारी पहाटे उघडकीस आली आहे. यामुळे वाळूज परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उमेश सोनवणे (रा. देगाव ता. माळशिरस जि. सोलापूर) या ट्रकचालकाने बुधवारी पहाटे कंपनीतून आपल्या ट्रक (क्र. एमएच-45 – 21 22) मध्ये लोखंडी सळया भरल्या. हा माल त्याला पुण्याला पोहोचवायचा होता. औरंगाबाद मार्गे नगररोडकडे पुण्याला निघाला. पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास सोनवणे ट्रक घेऊन वाळूज जवळ असलेल्या देवगिरी कंपनी जवळ पोहोचला. अचानकपणे मागून विना क्रमांकाची हिरव्या रंगाची स्कार्पियो जीप पाली. जीप चालकाने जीप ट्रक समोर येऊन उभी केली. त्यामुळे ट्रक चालकही थांबला.
त्यातील चार जणांनी धावत येऊन ट्रक चालकाला मारहाण केली मग स्कार्पिओ की एकाने ट्रकचा ताबा घेतला आणि ट्रक घेऊन ते पसार झाले. त्यांनी ट्रक चालकाच्या डोळ्यावर पट्टी बांधून धुळे मार्गावर सोडून दिले. त्यानंतर ट्रक चालक सोनवणे यांनी दौलताबाद पोलीस ठाणे नंतर छावणी पोलीस ठाणे गाठले. तेथून त्याला घटना वाळूजला घडली असल्याने वाळुज ठाण्यात जावे लागले. तोपर्यंत बराच वेळ निघून गेला होता. दरम्यान याप्रकरणी सोनवणे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध वाळुज ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.