कराड | विधान भवन मुंबई येथे कार्यालयात शिपाई म्हणून नोकरीला लावतो असे सांगत 3 लाख रुपयांची एकाची फसवणूक केली. याप्रकरणी दोघांवर कराड तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी संशयितांना अटक केली असून त्यांना न्यायालयात हजर केले असता, त्यांची पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
अनिल दत्तात्रय कचरे (रा. मलकापूर, ता. कराड) व प्रमोद सोलापुरे (रा. मुंबई, पूर्ण नाव, गाव माहित नाही) अशी फसवणूक प्रकरणी कोठडी मिळालेल्या संशयित दोघांची नावे आहेत. याप्रकरणी गणेश शिवाजी शिंदे (रा. येळगाव, गणेशवाडी, ता. कराड) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. यामधील संशयित अनिल कचरे याच्यावर यापूर्वी कराड शहर पोलिस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांच्याकडून या गुन्ह्यात अजूनही तक्रारदाराची संख्या वाढू शकते असे सांगण्यात आले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गणेश शिंदे यांना मुंबई येथे विधान भवन कार्यालयात नोकरीला लावतो असे म्हणून अनिल कचरे व प्रमोद सोलापुरे यांनी त्याच्याकडे 4 लाख रुपयांची मागणी केली. याप्रसंगी 3 लाख रुपये देतो असे गणेश शिंदे यांनी आई व चुलते वसंतराव शिंदे यांच्या समक्ष सांगितले. त्यावेळी प्रमोद सोलापूरे यांनी ठीक आहे, असे म्हणून 3 लाख रुपयाला नोकरीला लावण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर गणेश शिंदे याने पतसंस्थेत सोनेतारण करत 70 हजार रुपये कर्ज काढले. तसेच मामाकडून 30 हजार रुपये उसने आणले. असे एकूण 1 लाख रुपये आई व चुलते बबनराव शिंदे यांच्या समक्ष अनिल कचरे याच्याकडे दिली, तर राहिलेले 2 लाख रुपये नोकरीची ऑर्डर आल्यानंतर देतो, असे सांगितले.
त्यानंतर गणेश शिंदे यांनी अनिल कचरे व प्रमोद सोलापूरे यांना फोन केला असता त्यांनी विधान भवन मुंबई येथे शिपाई म्हणून रुजू होण्याबाबतची ऑर्डर मुंबई येथे विटी रेल्वे स्टेशनला दिली. त्यावेळी राहिलेली 2 लाख रुपये अनिल कचरे यांच्या जवळ देण्यास प्रमोद सोलापूर यांनी सांगितले. त्यामुळे गणेश शिंदे यांचे वडील शिवाजी मारुती शिंदे यांनी अनिल कचरे यांच्या अकाउंटवर 2 लाख रुपये ट्रान्सफर केले. त्यानंतर नोकरीसाठी गणेश शिंदे यांनी अनिल कचरे व प्रमोद सोलापुरे या दोघांना वारंवार फोन केला असता त्यांनी लॉकडाउन, संचार बंदी असल्याने तुम्हाला हजर करून घेणार नाहीत, असे सांगितले. सर्व व्यवहार सुरळीत सुरू होताच तुझे काम होईल, असेही त्यांनी गणेश शिंदे यांना सांगितले.
त्यानंतर जून 2021 मध्ये प्रमोद सोलापुरे यांनी गणेश शिंदेला फोन करून हजर होण्यासाठी मुंबई येथे बोलावले. तेथे प्रमोद सोलापुरे याने गणेशला बीएमसी मुंबई पोस्ट किंवा मंत्रालयात कॅन्टीनमध्ये नोकरी देण्याची ऑफर देत जादा पैशांची मागणी केली. परंतु ज्यादा पैसे देऊ शकत नसल्याने गणेश शिंदे यांनी प्रमोद सोलापूरेची ऑफर नाकारली. त्यावेळी शिंदे यांनी माझ्या अगोदरच्या कामाचे काय झाले ते सांगा, नाहीतर आमचे पैसे परत करा असा आग्रह सोलापुरे याच्याकडे धरला.
त्यावर सोलापूर यांनी तुमचा व्यवहार अनिल कचरे बरोबर झाला आहे, त्याच्याशी बोला असे सांगितले. त्यामुळे गणेश शिंदे यांनी अनिल कचरे याच्याशी संपर्क साधला असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच गणेश शिंदे यांनी कराड तालुका पोलीस ठाण्यात अनिल कचरे व प्रमोद सोलापुरे यांच्या विरोधात तक्रार दिली. पोलिसांनी प्रथम अनिल कचरे याला अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता सहा दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. त्यानंतर पोलिसांनी प्रमोद सोलापुरे याला अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता तीन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. अधिक तपास पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे करत आहेत.