कराड | आगाशिवनगरचा युवक मंगेश बंडू कडव यांचे आत्महत्या प्रकरण गाजू लागले आहे. पोलिसांनी तपास करत त्या प्रकरणात आणखी दोघांना गजाआड केले. विक्रम जयवंत येडगे (वय- 22, रा. जखीणवाडी, ता. कराड) व संतोष प्रल्हाद मदने ऊर्फ तात्या (वय- 22, रा. वनवासमाची, ता. कराड) अशी दोघांची नावे आहेत. त्यामुळे या प्रकरणातील अटक झालेल्यांची संख्या 4 झाली आहे. या प्रकरणातील एका युवतीचाही संशयित म्हणून समावेश आहे, ती सध्या फरारी आहे असल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक रेखा दुधभाते यांनी दिली.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मंगेश कडवला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एका महिलेसह चौघांवर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मंगेश कडवने वारणा नदीत उडी घेऊन आत्महत्या केली होती. याप्रकरणी मंगेशचा भाऊ गणेश कडवने फिर्याद दिली आहे. या प्रकरणातील ओंकार व रोहन यांना पोलिसांनी यापूर्वीच अटक केलेली आहे. त्यांच्याकडे कसून तपास सुरू आहे.
मंगेशला ओंकार खबाले- पाटीलने दोन सप्टेंबरला मारहाण केली होती. मंगेशच्या वडिलांनी त्या वेळी ओंकारसहित त्याची बहिणी स्वाती बोराटे व अन्य चौघांनी मंगेशला मारहाण करताना पहिले होते. त्या वेळी वडिलांनी मंगेशला सोडवले. त्यानंतर मंगेश दुचाकीवरून बेपत्ता होता. रात्री उशिरापर्यंत तो घरी गेलाच नाही. मंगेशची दुचाकी पेठ वडगावच्या हद्दीत वारणा नदीच्या पुलावर सापडली. पोलिसांनी ती जप्त केलेली आहे. त्याचदरम्यान मंगेशचा मृतदेह वारणा नदीत कणेगावच्या हद्दीत सापडला. मंगेशला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी आतापर्यंत चौघांना अटक झालेली आहे. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक रेखा दुधभाते करत आहेत.