हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांविरोधात पोलिसांकडून धडक कारवाई केली जात आहे. आज पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेतील अंमली पदार्थ विरोधी पथक-2 च्या पथकाने सातारा व सोलापूर येथील युवकांना अटक केली. पुणे स्टेशन परिसरातील ताडीवाला रोडवरील रेल्वे गेटच्या समोरून दोघांना पथकाने ताब्यात घेतले. त्यांच्याकडून तब्बल 81 किलो 755 ग्रॅम वजनाचा 16 लाख 35 हजार 100 रूपये किंमतीचा गांजा पथकाने जप्त केला आहे.
शशिकांत चांगदेव नलावडे (29, रा. धनगरवाडी, कोडोली, सातारा) आणि प्रतिक युवराज ओहोळ (19, रा. सालसे, ता. करमाळा, सोलापूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, आज सोमवारी अंमली पदार्थ विरोधी पथक-2 मधील पोलिस अंमलदार योगेश मांढरे यांना संबंधित आरोपी हे गांजा विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली. त्यांनी हि माहिती आपल्या पथकास दिली. काही वेळेनंतर अंमली पदार्थ विरोधी पथक-2 ने सापळा रचला आणि आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून 81 किलो 755 ग्रॅम वजनाचा 16 लाख 35 हजार 100 रूपये किंमतीचा गांजा तसेच 20 हजार रूपये किंमतीचे 2 मोबाईल फोन आणि 3 हजार रूपयाच्या दोन बँग तसेच 1150 रोख असा एकुण 16 लाख 59 हजार 250 रूपयाचा माल जप्त करण्यात आला आहे.
आरोपींविरूध्द बंडगार्डन पोलिस स्टेशनमध्ये एन.डी.पी.एस. अॅक्ट (NDPS Act) कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी शशिकांत चांगदेव नलावडे हा समर्थ पोलिस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या एका एनडीपीएस कायद्यान्वये दाखल असलेल्या गुन्हयात फरारी होता.
संबंधित कामगिरी पोलिस आयुक्त रितेश कुमार, सह पोलिस आयुक्त संदिप कर्णिक, अप्पर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलिस उपायुक्त अमोल झेंडे, सहाय्यक पोलिस आयुक्त सतीश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सुनिल थोपटे, पोलिस उपनिरीक्षक शुभांगी नरके, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक शिवाजी घुले, पोलिस अंमलदार योगेश मांढरे, पोलिस संतोष देशपांडे, पोलिस चेतन गायकवाड, पोलिस प्रशांत बोमदांडी, पोलिस संदीप जाधव, पोलिस मयुर सुर्यवंशी, पोलिस महेश साळुंखे, पोलिस साहिलसय्यद शेख, पोलिस संदिप शेळके, पोलिस नितीन जगदाळे, पोलिस युवराज कांबळे, पोलिस अझीम शेख आणि पोलिस दिनेश बस्तेवाड यांच्या पथकाने केली आहे.