शेअर बाजारातील आर्थिक नुकसानामुळे दोघांची आत्महत्या

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – मुंबईमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये शेअर बाजारातील आर्थिक नुकसानाला कंटाळून दोन जणांनी आत्महत्या केली आहे. हि घटना मुंबईतील मुलुंड परिसरात घडली आहे.

काय आहे प्रकरण ?
हाती आलेल्या माहितीनुसार, सोमवारी मुलुंड पूर्व येथील उमा सोसायटीतील एका घरात आत्या व भाच्याचा मृतदेह आढळून आला. यानंतर पोलिसांनी घराची झडती घेतली असताना त्यांना घरात शेअर बाजारातील आर्थिक नुकसानाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे नमूद केलेली चिठ्ठी आढळून आली. तीन दिवसांपूर्वी त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.

राजेश विठ्ठल कांबळी आणि प्रमोदिनी रघुनाथ कांबळी अशी मृत व्यक्तींची नावे आहेत. हे दोघेजण मुलुंड पूर्व येथील महात्मा फुले मार्गावरील उमा सोसायटीतील खोली क्रमांक 2 मध्ये राहत होते. बंद घरातून दुर्गंधी येत असल्यामुळे स्थानिक रहिवाशांनी याची माहिती पोलिसांना दिली. यानंतर पोलिसांनी दरवाजा तोडून घरात प्रवेश केला असता दोन मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. या दोघांनी 11 मार्चला आत्महत्या केली असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या दोघांनी शेअर बाजारातील नुकसानाला कंटाळून आत्महत्या केल्याचे चिठ्ठी लिहिले आहे. मुलुंड पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.