पाटण प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
पाटण तालुक्यात उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांच्या मतदारसंघात रविवारी संध्याकाळी शिवसेनेच्या माजी पदाधिकाऱ्याने केलेल्या बेछूट गोळीबारात दोघे जागीच ठार झाले. गोळीबारात ठार झालेल्या दोघांचे मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी कराडच्या वेणुताई चव्हाण उपजिल्हा रूग्णालयात आणले आहेत.
सोमवारी सकाळी साडेआठ वाजता मृतांचे शवविच्छेदन प्रक्रियेला कागदोपत्री सुरूवात झाली. दरम्यान शवविच्छेदनापुर्वी ठार झालेल्या दोघा मृतांच्या शरीराचे संपुर्ण स्कॅनिंग करण्यात येणार असल्याचे वैद्यकीय सत्रांनी सांगितले. श्रीरंग लक्ष्मण जाधव (सध्या रा. कोपरी, ठाणे, मुळ रा. कोरडेवाडी ता. पाटण), सतिश बाळासो सावंत (रा. कोरडेवाडी ता. पाटण) यांच्यावर गुरेघर येथे बेछूट गोळीबार झाल्याने यामध्ये दोघेही जागीच ठार झाले.
शिवसेनेचे माजी नगरसेवक मदन कदम यांच्याशी दोघा मृतांचा वाद सुरू होता. यातून त्यांच्यात धुसफूस सुरू होती. श्रीरंग जाधव हे सुद्धा ठाण्याला वास्तव्यास होते. ते रविवारी सकाळी सोसायटी मतदानासाठी आले होते. त्यानंतर रात्री नऊच्या सुमारास संशयित मदन कदम यांच्या फार्महाऊसवर श्रीरंग जाधव, सतिश सावंत हे गेले होते. त्यांच्यात तिथे वाद झाल्यानंतर संशयित मदन कदम यांनी लांब पल्ल्याच्या बंदूकीने त्यांच्यावर बेछूट गोळीबार केला. यात दोघे जागीच ठार झाले तर अन्य एकजण जखमी झाला.
मृत दोघांच्या डोक्याला व मानेवर गोळी लागल्याच्या खुणा आहेत. त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कराडच्या उपजिल्हा रूग्णालयात आणला. सोमवारी सकाळी मृतदेह शवागरातून बाहेर काढत स्कॅनिंगसाठी नेण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. स्कॅनिंग केल्यानंतर शरिरात नेमक्या किती गोळ्या घुसल्या आहेत हे स्पष्ट होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्याचा अहवाल महत्त्वाचा मानला जाईल. यानंतर शवविच्छेदन प्रक्रियेला सुरूवात केली जाईल. या पार्श्वभुमीवर उपजिल्हा रूग्णालयाच्या आवारात पोलिसांनी बॅरिगेटींग केले असून वरिष्ठ पोलीस निरिक्षक बी. आर. पाटील यांनी तेथील बंदोबस्ताचा स्वतः आढावा घेतला.