सातारा | सातारा पालिकेच्या वसुली विभागाच्या दोन मदतनीसांनी तक्रारदाच्या घराची घरपट्टी शासनाच्या नवीन नियमानुसार आकारणी करण्यसाठी 5 हजार रुपयांची लाच मागितली होती. लाच घेताना लाचलुचपतच्या प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले ही कारवाई शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता महसूल विभागाच्या दालन परिसरात झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.
लाचलुचपत विभागाचे अतिरिक्त पोलिस उपअधीक्षक सुजय घाडगे यांनी दिलेली माहिती अशी, चतुर्थ वार्षिक पाहणीच्या पाहणी पत्रकात भाडेकरूची नोंद न घालण्यासाठी ही लाच घेताना कारवाई करण्यात आली. लिपिक विनायक विलास गोडबोले (वय- 53, रा. सातारा) व प्रदीप ऊर्फ बाळू कदम (वय- 57 रा. व्यंकटपुर पेठ) अशी लाच घेणाऱ्यांची नावे आहेत.
वसुली विभागाची सध्या सातारा शहर आणि हद्दवाढ क्षेत्रात चतुर्थ वार्षिक पाहणी प्रक्रिया सुरू आहे या वार्षिक पाहणीच्या पाहणी पत्रकामध्ये मालक व भाडेकरू अशा दोन स्वतंत्र नोंदी करावयाचे असतात. यामध्ये भाडेकरूंची नोंद न घेण्यासाठी शनिवार पेठेतील तक्रारदाराकडे विनायक गोडबोले व प्रदीप कदम या दोघांनी पाच हजार रुपयांची लाच मागितली. तक्रारदाराने सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एस. एस. राऊत यांच्या नेतृत्वाखाली पथकाने सायंकाळी पाच वाजता महसूल विभागाच्या दालनातच सापळा रचला व विनायक गोडबोले व प्रदीप ऊर्फ बाळू कदम या दोघांना पाच हजाराची लाच घेताना पकडले. संबंधितांवर सातारा शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक विक्रम पवार, सचिन राऊत, हवालदार संभाजी काटकर, प्रशांत ताटे, विशाल खरात, तुषार भोसले, विनोद राजे हे यांनी कारवाईत केली.