औरंगाबाद | महापालिकेमध्ये 2016 मध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या सातारा देवळाई परिसराचे सध्या प्रचंड प्रमाणात हाल सुरु असून या वसाहतीमध्ये ड्रेनेज, रस्ते, पाणी, पथदिवे या मूलभूत सुविधा नसल्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत.
गेल्या अडीच वर्षापासून महानगरपालिकेने विकास कामे करणार असल्याचा देखावा करत डीपीआर तयार केला. यामध्ये पीएमसी मार्फत पाणी पुरवठा योजनेचा 400 कोटींचा डीपीआर, पीएमसी नियुक्त करून ड्रेनेजलाईनचा डीपीआर, त्याचबरोबर रस्त्यांचाही डीपीआर तयार करण्यात आला. परंतु मी कामे अजूनही सुरू झालेली नाही.
जुलै 2019 मध्ये महापालिकेने या भागातील खुल्या जागा, रस्ते, स्मशानभूमी, कब्रस्तान विकसित करण्याचा डीपीआर बनवण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी पीएमसी नियुक्त करण्यात आली होती. सध्या ड्रेनेजलाईन साठी नव्याने प्रस्ताव तयार केला जात असून यापूर्वी 180 कोटींचा डीपीआर तयार करून शासनाला सादर करण्यात आला आहे. पण यासंदर्भात अजूनही निर्णय झालेला नाही. त्यामुळे नवीन डीएसआर नुसार प्रस्ताव तयार केला जाणार आहे. त्यासाठी निवृत्त कार्यकारी अभियंता अफसर सिद्दीकी यांची नियुक्ती करण्यात आली. हा डीपीआर 200 कोटींपर्यंत जाण्याची शक्यता आहे.




