ट्रॅक्टरला दुचाकी धडकून दोन जण गंभीर जखमी; पैठण जवळील घटना

Accident
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – दिवसभराचे आपले काम आटोपून भरधाव वेगात पाचोडहुन दुचाकीने आंतरवाली (खांडी) (ता.पैठण) या गावी परतणाऱ्या तरुणाची दुचाकीसमोर जाणाऱ्या ऊसाच्या ट्रॅक्टरला धडकून दोघेजण गंभीर जखमी झाल्याची घटना धूळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील आडगाव जावळेजवळ (ता.पैठण) शनिवारी सायंकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास घडली.

यासंबंधी अधिक माहिती अशी, आंतरवाली खांडी (ता.पैठण) येथील काशीनाथ रामेश्वर हांडे (30) व अंकुश मुरलीधर दिसागज (32) हे दोघे जण पाचोडहून आपले दिवसभराचे खासगी काम आटोपून दुचाकीने भरधाव वेगात गावी जात होते. ते आडगाव जावळेजवळ वळणावर पोहोचले असता समोर ऊस घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरचा अंदाज न आल्याने सदर दुचाकी ‘त्या’ ट्रॅक्टरला पाठीमागून जोराने धडकली. यात दुचाकीवरील दोघे जण रस्त्याच्या कडेला दूर फेकले गेले. अपघातानंतर अंधाराचा फायदा घेऊन घटनास्थळीवरून सदर ऊसाचे ट्रॅक्टर पसार झाले. यांत दुचाकीचा पूर्णत: चुराडा झाला.

स्थानिक नागरिकांना या अपघाताची माहिती मिळताच त्यांनी घटनस्थळी धाव घेऊन मदत कार्य केले व घडलेल्या या अपघाताची माहिती पाचोडजवळील भोकरवाडी टोलनाक्यावरील रुग्णवाहिका चालकास दिली. ही माहिती मिळताच रुग्णवाहिका कर्मचारी महेश जाधव, विठ्ठल गायकवाड यांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेऊन जखमींना रुग्णवाहिकेमधून औरंगाबाद येथील घाटी रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. या घटनेची उशिरापर्यंत पोलिसांत तक्रार दाखल नव्हती.