दुचाकी होणार स्वस्त! GST कर कमी केला जाण्याची शक्यता

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । वस्तू व सेवा करासाठी (GST ) नेमण्यात आलेल्या GST कौन्सिलची ४१ वी बैठक (41st gst council meeting today) आज गुरुवारी सकाळी ११ वाजता होणार आहे. कोरोनाचा प्रकोप पाहता आजच्या GST कौन्सिलच्या बैठकीत कर कपातीची दाट शक्यता आहे. आजच्या बैठकीत काही वस्तूंच्या GST करात कपात किंवा त्यांचा कर स्तर बदलला जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, आजच्या बैठकीत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिलेल्या माहितीनुसार जीएसटी कौन्सिल दुचाकींवरील करदरांचा आढावा घेण्याची शक्यता आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र सरकार दुचाकींवरील जीएसटी कमी करण्याचा विचार करीत आहे. सीआआयशी झालेल्या बैठकीत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनीही दर कमी होण्याचे संकेत दिले आहेत. त्यानुसार दुचाकीवरील GST कर कमी केला जाण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे. बाइक आणि मोपेडसारख्या दुचाकी वाहनांवरील GST कर कमी केल्यास त्यांच्या किंमतीत १० हजार रुपयांची कपात होण्याची शक्यता आहे.

केंद्र सरकारने दुचाकीवरील जीएसटीचे दर २८ टक्क्यांवरून १८ टक्क्यांपर्यंत घटवल्यास हे शक्य आहे, असे मत बजाज ऑटोचे व्यवस्थापकीय संचालक राजीव बजाज यांनी व्यक्त केले. गेल्या वर्षभरापासून वाहन उद्योगाची स्थिती बिकट असून, त्यात आता कोरोनाची भर पडली आहे. वाहन उद्योगाने विनंती केल्यानुसार जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत जीएसटीचा दर कमी करण्यावर चर्चा होईल, असे सीतारामन यांनी सीआयआयशी झालेल्या बैठकीत स्पष्ट केले. राजीव बजाज यांच्या मते वाहन उद्योग गेले वर्षभर अनेक समस्यांचा सामना करीत आहेत. त्यामुळे जीएसटीचे दर कमी करून उद्योगाला दिलासा देण्याची आवश्यकता आहे. जीएसटीचे दर कमी झाल्यास ग्राहक आणि वाहन उद्योगालाही दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

दुचाकी वाहनांवरील जीएसटी घटविण्याच्या प्रस्तावाचे निर्मला सीतारामन यांनी स्वागत केले असून, हा एक चांगला प्रस्ताव असल्याचे म्हटले आहे. दुचाकी चैनीच्या (लक्झरी) वस्तूंत मोडत नाहीत. सध्या दुचाकींवर २८ टक्के जीएसटी आकारण्यात येतो. दुचाकी वाहनांची निर्मिती करणारी देशातील सर्वांत मोठी कंपनी हीरो मोटोकॉर्पनेही गेल्या वर्षी दुचाकी वाहनांच्या विक्रीवरील जीएसटी दरात घट करण्याचे आवाहन केले होते. त्याची सुरुवात १५० सीसी मोटारसायकलवरील जीएसटी १८ टक्के करून होण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”