तान्हुल्या बाळासह माथेफिरूशी लढणाऱ्या “हिरकणी”चा खा. उदयनराजेंनी केला सत्कार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

पुसेगाव येथे रात्रीची वेळ असताना पती पाणी आणण्यासाठी गाडीतून बाहेर पडताच माथेफिरूने गाडीमध्ये प्रवेश करून काही अंतर गाडी पळवण्याचा प्रयत्न केला होता. अॅड सौ. जयश्री गोरे आणि लहानग्या बाळासह कारचे अपहरण करण्याचा थरारक प्रसंग अंगावर काटा आणणारा होता. या घटनेत जयश्री गोरे या हिरकणीसारख्या बेडरपणे लढल्या. त्याचा आज छ. खा. उदयनराजे भोसले यांनी सत्कार केला.

पुसेगाव येथे तान्हे बाळासोबत असलेल्या या महिलेने एका हाताने बाळाला सांभाळत दुसऱ्या हाताने कारचा हॅन्ड ब्रेक ओढला, तर पायाने त्यांनी संशयिताला लाथा मारण्यास आणि प्रतिकार करण्यास सुरुवात केली. चालत्या कारमध्ये महिला बचावासाठी संशयित युवकासोबत झटापट करत होत्या. मात्र संशयिताने ओरडू नका नाहीतर जीव घेईन, असे म्हणत महिलेचा गळा धरुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, तरीही जयश्री गोरे डगमगल्या नाहीत. धाडसाने त्यांनी प्रतिकार केला. काही वेळ झुंज झाल्यानंतर आरोपीने गाडीतून पळ काढला आणि या सर्वांची सुखरूप सुटका झाली.

खासदार उदयनराजे भोसले यांनी वकील असलेल्या गोरे यांना भेटून त्यांच्या जिद्दीचे आणि हिमतीचे कौतुक केले. यावेळी छ. उदयनराजे म्हणाले, प्रत्येक महिलेने या धाडसाची नोंद घ्यावी. कधीही अन्याय सहन करू नये. जयश्री गोरे यांनी परिस्थिती योग्य पध्दतीने हाताळत आपल्यावर आलेला वाईट प्रसंग दूर लोटला. तेव्हा नारीशक्ती किती जबरदस्त आहे, यांची प्रेरणा महिलांना यातून मिळेल.