उदयनराजेंच्या पेंटिंगवरून कार्यकर्ते-पोलिसांच्यात शाब्दिक चकमक; साताऱ्यात तणावाचे वातावरण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
सातारचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या पोवई नाक्यावरील कोयना दौलत या निवासस्थाना नाजिक खासदार उदयनराजे यांच्या मालकीचे इमारतीवरील भिंतीवर पेंटिंग काढण्याचे काम सुरु होते. यावेळी पोलिसांनी संबंधितांना पेंटिंग मज्जाव केल्याने पोलीस व उदयनराजे भोसले यांच्या कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. यावेळी कार्यकर्त्यांनी थेट इमारतीवरून उडी मारण्याचा इशारा दिल्याची घटना मंगळवारी घडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या पोवई नाक्यावरील ‘कोयना दौलत’ या निवासस्थाना नजीक इमारतीवरील भिंतीवर सोमवारी रात्री क्रेनच्या साहाय्याने पेंटिंग काढण्यात येणार होते. मात्र, सातारा पोलिसांनी हे पेंटिंग काढण्यास विरोध करत संबंधित क्रेन आणि उदयनराजेंच्या कार्यकर्त्यांना मज्जाव केला. दरम्यान, आज (मंगळवार) सकाळी पुन्हा पेंटरकडून पेंटिंग काढण्याचे काम सुरू करण्यात आले. या पेंटरला पोलिसांनी विरोध करत काम थांबवण्यास सांगितले. यावेळी पेंटर पाटोळे व पोलिसांच्यात शाब्दिक चकमक उडाली.

यावेळी झालेल्या वादावादीमध्ये पोलिसांनी पेंटरला ताब्यात घेतल्याने तणाव निर्माण झाला आहे. पेंटिंग काढू न दिल्यास इमारतीवरून उडी मारण्याचा इशारा यावेळी पेंटरने दिला आहे. या घटनेवरून खा. उदयनराजे भोसले यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.