हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । छत्रपती शिवाजी महाराजांची 393 वी जयंती आज 19 फेब्रुवारी रोजी संपूर्ण देशभरात साजरी होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला यावर्षी 350 वर्षे पूर्ण होत असून महाराजांनी स्वराज्य रक्षणासाठी उभारलेल्या गड-किल्ले आदींवर शिवजयंती साजरी केली जात असून या पार्श्वभूमीवर, छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट तेरावे वंशज आणि साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी फेसबुक पोस्ट द्वारे महाराजांना जयंतीदिनी अभिवादन केले आहे.
छत्रपती शिवराय म्हणजे, मातृभूमीला लाभलेलं एक बहुमूल्य वरदान आहे. महाराजांनी पेटवलेली क्रांतीची मशाल पिढ्यानपिढ्या पुढं सरसावत आहे एखाद्या झंझावाताप्रमाणं.. म्हणूनच, छत्रपती शिवाजी महाराज आजही सर्वांच्या श्वासात, मनात, हृदयात, जगण्यात वसतात, असे फेसबुक पोस्टमध्ये छत्रपती उदयनराजे भोसले यांनी म्हंटले आहे.
https://www.facebook.com/Chh.UdayanrajeBhonsleOfficial/posts/788826605938724
शून्यातून स्वराज्य उभारुन नवा इतिहास रचणाऱ्या शिवरायांनी दाखवून दिलेल्या मार्गावरुन चालण्याचा निश्चय करुयात, असं सांगत खासदार उदयनराजे भोसले यांनी संपूर्ण देशवासियांना शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करण्यासाठी आणि महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीविषयी अभिमान व्यक्त करण्यासाठी शिवजयंतीच्या दिवशी सर्वत्र विविध कार्यक्रमांचे आयोजन केले असून किल्ले शिवनेरीवर शिवजन्मोत्सव सोहळा साजरा केला जाणार आहे.