चिलेवाडीतील वाॅटर कप स्पर्धेच्या श्रमदानात उदयनराजेंनी घेतला सहभाग
सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
अन्न गुडगुडे, नीर गुडगुडे… दुष्काळ… दुष्काळ… ढिचक्याँव ढिचक्याँव ढिचक्याँव…! असे काहीसे गंमतीशीर असलेले हे वाक्य दुष्काळग्रस्त भागात श्रमदान करणा-यांचं प्रेरणाघोष ठरले आहे. मंगळवारी सकाळी सातारा लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस, राष्ट्रवादी व मित्र पक्षांचे अधिकृत उमेदवार श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी कोरेगाव तालुक्यातील चिलेवाडी या गावास भेट दिली. पाणी फाऊंडेशनच्या वाॅटर कप स्पर्धेत या गावाने भाग घेतला आहे.
अगदी भल्या सकाळी ६ वाजता गावातील महिला, पुरुष, युवा वर्ग हातात कुदळ- फावडी- घमेली घेऊन श्रमदानासाठी बाहेर पडत आहेत. शेतीचा बांध बंदिस्त करण्याचे काम श्रमदानातून सुरू आहे. या कामामुळे पावसाळ्यात शेतातील माती अोढ्या नाल्यात वाहुन न जाता ती शेतातच राहण्यास मदत होणार आहे.
यावेळी श्री. छ उदयनराजे यांनी ग्रामस्थांच्या एकजुटीचे कौतुक करुन गावास आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याची ग्वाही दिली. आपल्या कुटुंबातील लहान मुलांचे भावी आयुष्य समृद्ध व्हायचे असेल तर वृक्ष तोडीस प्रतिबंध, पाणी बचत व वृक्ष लागवड ही त्रिसुत्री अंमलात आणावी लागेल, असे आवाहन श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी या प्रसंगी बोलताना केले.
गावातील सर्व वयोगटातील अबालवृध्द पुरुष व स्त्रिया मोठ्या उत्साहात श्रमदान करताना पाहून मनाला नवी ऊर्जा मिळाली व चिलेवाडीतील ग्रामस्थांशी संवाद साधून खुप आनंद झाला. माझ्याकडून जी लागेल ती मदत करण्याचा शब्द देतो, असेही आश्वासन यावेळी खा. उदयनराजेनी दिले.
सामाजिक कार्यकर्ते डाॅ. अविनाश पोळ, फाउंडेशनचे समन्वयक बाऴासाहेब शिंदे, चिलेवाडीच्या उपसरपंच मंगल जाधव, काका धुमाळ, धर्मराज जगदाळे, राहूल बासल, अमर ढोले, सागर ढोले, किरण शेडगे, चेतन ढोले, संदीप पवार, राजेंद्र घोरपडे, श्रीकांत फाळके, लता ढोले, सतीश साळुंखे व चिलेवाडी ग्रामस्थ मोठ्या संख्येने श्रमदानात सहभागी झाले होते.