सतारा प्रतिनिधी | राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आजपर्यंत निष्ठावंत समजले जाणारे, ज्यांच्यावर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी, जनतेने अपार प्रेम केले. छत्रपती उदयनराजे भोसले राष्ट्रवादीतून बाहेर पडण्याच्या तयारीत आहेत. एवढेच नव्हे तर त्यांच्या भाजपप्रवेशाची खास तयारीदेखील झाली असल्याचे कळते.
येत्या १ ते ५ सप्टेंबर या काळात उदयनराजे भाजपाध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत मुंबईमध्ये त्यांचा पक्षप्रवेश होऊ शकतो. एवढेच नव्हे तर, खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर लोकसभेची पोटनिवडणूक ही विधानसभेसोबतच घ्यावी, अशी इच्छाही उदयनराजेंनी बोलून दाखवली आहे. उदयनराजे यांची भाजपसोबत नेहमीच जवळीक राहिली आहे. भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे आणि उदयनराजे यांची जवळीक महाराष्ट्राला माहीत आहे. त्यातच गेल्या काही दिवसांपासून उदयनराजे राष्ट्रवादीपासून दुरावल्याचं चित्र आहे.
विशेष म्हणजे साताऱ्यात राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडेही उदयनराजेंनी पाठ फिरवली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याचा समारोप १ सप्टेंबरला सोलापुरात होत आहे. या कार्यक्रमासाठी भाजपाध्यक्ष अमित शहा उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात उदयनराजे भोसले यांचा भाजपप्रवेश होण्याची शक्यता आहे.