सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके
सावित्रीबाई फुले यांच्या जिल्ह्यात अशा दुर्घटना घडणे, दुर्दैव असून महिलांना मारहाण करणाऱ्यांना फोडून काढले पाहिजे. पुरूषार्थ याला म्हणत असतील तर दम असेल तर दाखवा ना मग. मला सांगा कधी यायचे बघतो एके- एकेकाडे असे जाहीर आव्हान खा. छ. उदयनराजे भोसले यांनी विरोधकांना दिले.
सातारा नगरपालिकेचे भाजपचे माजी नगरसेवक आमदार शिवेंद्रराजे भोसले यांचे समर्थक धनंजय जांभळे यांनी खासदार उदयनराजे भोसले यांच्या सातारा विकास आघाडीच्या माजी नगरसेविका असलेल्या महिलेला मारहाण करत त्यांचा विनयभंग केला आहे. यावेळी महिलेचे पतीही तेथे उपस्थित होते. सातारा नगर पालिकेचे स्वच्छता कर्मचारी वॉर्डात काम करत असताना हा राडा झाला असून शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेची दखल घेऊन खासदार उदयनराजे भोसले यांनी संबंधित महिलेच्या घरी जाऊन विचारपूस केली.
यादोगोपाळ पेठेतील काय आहे प्रकरण
आज सकाळी पालिकेचे कर्मचारी यादो गोपाळ पेठेत रांगोळी काढण्याचे काम करत होते. यातूनच स्वच्छता आणि रांगोळी काढण्यावरून जांभळे यांच्यासह दुसऱ्या माजी नगरसेवका मध्ये वाद सुरू झाला. यावेळी माजी महिला नगरसेविका यांनीही घटनास्थळी धाव घेतली आणि वाद थांबण्याचा प्रयत्न केला असता जांभळे यांनी माजी नगरसेविका राहिलेल्या महिलेला मारहाण करत विनयभंग केला असल्याची तक्रार पोलिसांत दाखल करण्यात आली आहे. याबाबत पोलीस अधीक्षकांशी बोलणार असल्याचे सांगत उदयनराजेंनी संताप व्यक्त केलाय.या सर्व घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यानंतर पीडित महिलेने शाहूपुरी पोलिस ठाण्यात जाऊन जांभळे यांच्या विरुद्ध तक्रार दिलीये.