सकलेणं मुलाणी । कराड
“संघर्ष व्यक्तिगत नव्हता, तर विचारांचा होता. ज्या विचाराने देशाला स्वातंत्र्य मिळाले, त्या काँग्रेसची विचारधारा टिकवण्यासाठी एकत्र आलो आहोत” अशी प्रतिक्रिया साताऱ्यातील उंडाळकर गटाचे युवा नेते उदयसिंह पाटील उंडाळकर (Udaysingh Patil Undalkar)यांनी दिली. उदयसिंह पाटील उंडाळकर यांनी कराड तालुक्यात काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केला.
सातारा जिल्ह्यातील काॅग्रेसमधील दिग्गज नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि माजी मंत्री विलासकाका पाटील उंडाळकर एका व्यासपीठावर येत आहेत. या दोन्ही नेत्यांमध्ये गेल्या तीस वर्षांपासून संघर्ष सुरू होता. दोघांच्याही राजकीय वैरामुळे अनेकदा काँग्रेसला फटका बसला होता. हे दोन्ही गट काॅग्रेसच्या मेळाव्या निमित्त एकत्र येत आहेत. यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय समीकरण बदलणार आहेत.
यावेळी उदयसिंह पाटील उंडाळकर म्हणाले की, पृथ्वीराज बाबा आणि विलासकाका यांच्यातील पूर्वीचा संघर्ष हा कधीच व्यक्तिगत संघर्ष नव्हता. तो विचारांचा संघर्ष होता. पण हा संघर्ष असाच जर पुढे चालू ठेवला तर समाजामध्ये जी काही असामाजिक तत्त्वे काम करतायत आणि ज्या विचाराने या देशाला स्वातंत्र्य दिले त्या विचारापासून समाजाला लांब नेण्याचा जे प्रयत्न करतायत त्यांना थोपवणं अडचणीचे होईल आणि त्यामुळे समाजाची जी हानी होणार आहे ते नुकसान कधीही भरून येणार नाही. त्यामुळे एका जागी बसून आमच्यातील विचारांचं जे मतांतर होत ते संपवून कार्यकर्त्यांच्या माध्यमातून काँग्रेसच्या विचाराला पुन्हा एकदा प्रस्थापित करण्यासाठी आजचा हा मेळावा पार पडतोय. तसेच काँग्रेसची विचारसरणी समाजापर्यंत रुजवणे आणि समाजाला विकासात्मक करून त्यांचा उत्कर्ष करणे हाच या दोन्ही गटाचा अजेंडा असेल असेही उदयसिंह पाटील यांनी स्पष्ट केले.
विलासराव पाटील उंडाळकर यांचे पुत्र उदयसिंह पाटील हे पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसमध्ये जाहीरपणे सक्रिय होत आहेत. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय समीकरणं बदलण्याची चिन्हं आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात उदयसिंह पाटील उंडाळकर यांनी काँग्रेसमध्ये सक्रीय होण्याचा निर्धार केला.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’