हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात येत्या ३ महिन्यात विधानसभा निवडणुका होतील. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. राज्यातील महाविकास आघाडी सुद्धा विधानसभेत पुन्हा सत्ता आणण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यातच लोकसभा निवडणुकीत देदीप्यमान यश मिळाल्यानंतर महाविकास आघाडीचा विश्वास सुद्धा वाढला आहे. मात्र मुख्यमंत्री कोण असेल यावर मात्र महाविकास आघाडीत एकमत दिसत नाही. ज्याचे आमदार जास्त त्या पक्षाचा मुख्यमंत्री अशी काँग्रेसची भूमिका आहे. मात्र ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्री पदासाठी अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरेंचं (Uddhav Thackeray) नाव सुचवलं आहे. तसा स्पष्ट संदेश त्यांनी पत्रकार परिषदेत दिले.
संजय राऊत म्हणाले, विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार घोषित केला पाहिजे. मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याशिवाय विधानसभा निवडणुकांना सामोरे जाणं हा धोका आहे. या महाराष्ट्राने महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंचं काम बघितलं आहे. लोकसभेतील अनेक घटकांचे मतदान उद्धव ठाकरेंच्या चेहऱ्याकडे बघूनच झालेलं आहे. अर्थात तिघांची ताकद महत्व्वाची आहेच मात्र बिन चेहऱ्याचे सरकार अजिबात चालणार नाही असं राऊतांनी सांगितलं. संजय राऊतांनी एकप्रकारे उद्धव ठाकरेंनाच मुख्यमंत्री पदासाठी समोर केलं आहे.
काँग्रेस राष्ट्रवादीची सावध भूमिका –
दरम्यान, मुख्यमंत्री कोण व्हावा याच्यात मविआच्या कुठल्याही नेत्याने स्वारस्य ठेवू नये. आम्ही सत्तेवर आले पाहिजे हे स्वारस्य ठेवले पाहिजे. मविआत निवडून आलेले आमदार ठरवतील की मुख्यमंत्री कोण त्यामुळे महाविकास आघाडीतील कुठल्याही पक्षातील नेत्याने मुख्यमंत्री कोण होणार अशी भाषा करणे टाळले पाहिजे असं शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटलं होते. तर दुसरीकडे मुख्यमंत्री कोण यावर आम्ही चर्चा करत नाही. महाविकास आघाडी म्हणूनच आम्ही निवडणूक लढवणार आहोत असं म्हणत काँग्रेस आमदार बाळासाहेब थोरात यांनी अधिक बोलणं टाळलं.