हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Uddhav Thackeray At Shivtirth । महाराष्ट्राच्या राजकारणात आज मोठी घडामोड घडली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी दाखल झाले आहेत. राज ठाकरे यांच्या घरी दीड दिवसाचा गणपती असतो, त्यानिमित्ताने उद्धव ठाकरेंनी शिवतीर्थवर पोहचले आहेत. उद्धव ठाकरे पहिल्यांदाच शिवतीर्थावर पोहचले आहेत. त्यांनी गणपती बाप्पाचे आशीर्वाद घेतले आहेत. मागच्या काही महिन्यापासून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात जवळीक निर्माण झाली आहे. त्याचाच प्रत्यय आजही बघायला मिळाला. उद्धव ठाकरे आणि कुटुंबियांसाठी राज ठाकरेंकडून खास असा जेवणाचा बेतही आखण्यात आला आहे.
राजकीय पेरण्या होण्याची शक्यता- Uddhav Thackeray At Shivtirth
यापूर्वी मराठी भाषेसाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे प्रथमच एकत्र आले होते. त्यानंतर उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाला राज ठाकरे स्वतः थेट मातोश्रीवर पोहचले होते. त्यावेळी उद्धव ठाकरेंचा उल्लेख “शिवसेना पक्षप्रमुख” असा करत राज ठाकरेंनी महायुतीला धक्का दिला होता. त्यानंतर राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना फोनवरून गणपती दर्शनाचे निमंत्रण दिले होते, ते स्वीकारून उद्धव ठाकरेंनी आज सहकुटुंब शिवतीर्थवर जाऊन (Uddhav Thackeray At Shivtirth) राज ठाकरेंची भेट घेतली. निमित्त जरी गणपतीचे असलं तर यातून अनेक राजकीय पेरण्या होण्याची शक्यता आहे. आम्ही भाऊ भाऊ आता एक झालो आहोत असा थेट संदेशच या भेटीतून पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.
खरं तर राज ठाकरेंनी शिवसेना सोडल्यापासून म्हणजेच २० वर्षपासून उद्धव ठाकरे कधीही कृष्णकुंज किंवा शिवतीर्थावर गेले नव्हते, आज मात्र प्रथमच ते राज ठाकरेंच्या निवासस्थानी गेले आहेत. या भेटीमुळे दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना नवीन ऊर्जा मिळणार आहे. सध्या कुटुंब एक झालं आहे, मात्र जस जशी निवडणूक येईल तस तस दोन्ही पक्षही एकमेकांच्या आणखी जवळ येत जातील. भलेही सध्या दोन्ही ठाकरेंच्या युतीची अधिकृत अशी घोषणा झालेली नाही, परंतु सध्याच्या घडामोडी आणि वाढती जवळीक बघता आगामी काळात शिवसेना ठाकरे गट आणि मनसेची युती होण्याची दाट शक्यता आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र आले तर आगामी महापालिका निवडणुकीत महायुतीला मोठा फटका बसू शकतो. खास करून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला याचा फटका बसेल असं राजकीय विश्लेषक सांगतात.




