खिशात नाही आणा आणि मला बाजीराव म्हणा; भाजपावर उद्धव ठाकरेंची टीका

Uddhav Thackeray
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| आज अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडून पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी भाजप घेण्यासाठी प्रहार केला. यावेळी बोलताना, “अपयश लपवणारं हे अधिवेशन होतं” अशी बोचरी टीका देखील त्यांनी केली.

उद्धव ठाकरे म्हणाले की, “या सरकारने पाशवी बहुमत मिळवले असले तरी त्यांना लोकहिताचे काम करता आलेले नाही. अर्थसंकल्पात केवळ थापा मारल्या गेल्या, पण त्याच्या अंमलबजावणीबाबत काहीच स्पष्टता नव्हती. शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरूच आहेत, हमीभाव मिळत नाही, तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होत नाहीत. मग १०० दिवसांचा संकल्प गेला कुठे?”

१०० दिवसांत घडले काय?

तसेच, उद्धव ठाकरे यांनी राज्यात घडलेल्या गुन्हेगारी घटनांचा उल्लेख करत सरकारला लक्ष्य केले. ते म्हणाले की, “बीडमध्ये सरपंचांची हत्या झाली, सोमनाथ सूर्यवंशींची हत्या झाली, पुण्यात स्वारगेट परिसरात बलात्काराची घटना घडली. मुंबईत रस्त्यांमध्ये भ्रष्टाचार झालाय. पण सरकारकडे कोणत्याही प्रश्नांची समाधानकारक उत्तरे नाहीत. राज्यात जातीय तणाव निर्माण होत आहे, नागपुरात दंगल झाली. पण सरकार यावर कारवाई करण्याऐवजी विरोधकांना दडपण्यावर लक्ष केंद्रित करत आहे.”

भाजपाच्या ‘हिंदुत्वा’वर हल्ला

पुढे भाजपाचे हिंदुत्व केवळ दिखाव्याचे असल्याचा आरोप करत ठाकरे म्हणाले, “जेव्हा आम्हाला मुस्लिम मतं मिळाली, तेव्हा त्यांचे डोळे पांढरे झाले. मात्र, आता ते मुस्लिमांना ‘सौगात ए मोदी’ देत आहेत. वर्षभर हिंदुत्वाच्या नावाखाली राजकारण करायचं आणि निवडणुकीच्या आधी मुस्लिमांना खुश करण्याचा दिखावा करायचा, हे भाजपाचे धोरण आहे.”

इतकेच नव्हे तर, “ही सरकारची अवस्था ‘खिशात नाही आणा आणि मला बाजीराव म्हणा’ अशी झाली आहे. आश्वासनं दिली पण ती पूर्ण होत नाहीत. ‘लाडक्या बहिणींना पैसे वाढवणार’ अशी घोषणा केली, पण आज त्या बहिणींना विचारावं लागेल की ही योजना नको का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

दरम्यान, शिवसेना ही एकच आहे, शिवसेनेच्या गद्दारांचा गट मी मानतच नाही. आम्हाला जेव्हा मुस्लिम मतं मिळाली तेव्हा यांचे डोळे पांढरे झाले होते. मात्र बोगस हिंदुत्ववादी किंवा बुरसटलेले लोक आहेत त्यांना सौगात ए मोदीचं निर्लज्ज उदाहरण दिसलं आहे. अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर देखील टीका केली आहे.