हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा जाहीर मेळावा आज छत्रपती संभाजीनगरमध्ये पार पडला. यावेळी आपल्या भाषणात उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे आणि भाजपचा खरपूस समाचार घेतला. मी लाचारी, गद्दारी आणि हरामखोरांचा महाराष्ट्र होऊ देणार नाही. प्राणपणाने लढेन. पण माझ्या शिवरायांच्या भगव्याला कलंक लागू देणार नाही असं म्हणत उद्धव ठाकरेंनी शिंदेंवर हल्लाबोल केला. तसेच आगामी विधानसभा निवडणूक हि महाराष्ट्राच्या अस्मितेच्या अस्तित्वाची लढाई आहे असं म्हणत उद्धव ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले.
उद्धव ठाकरे म्हणाले, महाराष्ट्र हा साधूसंतांचा, शिवप्रभूंचा, मर्दांचा ही ओळख अशीच ठेवणार की, लाचार, गद्दार आणि हरामखोरांचा महाराष्ट्र अशी ओळख होऊ देणार? हे आपण ठरवा. मी तर लाचारी, गद्दारी आणि हरामखोरांचा महाराष्ट्र होऊ देणार नाही. प्राणपणाने लढेन. पण माझ्या शिवरायांच्या भगव्याला कलंक लागू देणार नाही. या गद्दांरांनी लोकसभेला चोरुन विजय मिळवला आहे. शिवसेना चोरली, धनुष्यबाण चोरलं. अरे चोरट्यांनो, भामट्यांनो तुमचा विजय हा खरा विजय नाही. अनेकांनी मला सांगितलं की आम्ही धनुष्यबाणाच्या चिन्हाला मतं दिली. कारण मशाल लोकांपर्यंत उशिरा पोहचली. आता मशालीच्या माध्यमांतून यांची पापं आपल्याला जाळायची आहेत असं म्हणत उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर घणाघात केला.
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, गळती सरकारचं शेवटचं अधिवेशन आहे. हे पुन्हा गादीवर बसणार नाही अशी शपथ घेऊन आपण मैदानात उतरलो पाहिजे. माता-भगिनींना समोर ठेवून निवडणुकीला सामोरं जायची तयारी यांनी सुरु केली आहे. गेली १० वर्षे मोदी सत्तेत आहेत. मागच्या दहा वर्षांत ज्या योजना जाहीर केल्या त्यातल्या किती अंमलात आणल्या? असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला. घरातील मुलींना मोफत शिक्षण मग मुलांना का मोफत शिक्षण दिले जात नाही, मुलींसाठी योजना आणता पण घराघरात भाऊ बेकार आहे. त्याचा कधी विचार करणार नाही असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला.