हात लावेन तिथे सत्यानाश, कोणाकोणाची माफी मागाल? ठाकरेंचा मोदींवर घणाघात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी आज महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) कडून निषेध व्यक्त करत सरकार विरोधात जोडो मारो आंदोलन (MVA Jodo Maro Aandolan) करण्यात आलं. शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शरद पवार, नाना पटोले यांच्यासह महाविकास आघाडीचे हजारो कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. मोदींनी शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर माफी मागितली होती, मात्र तुम्ही कोणाकोणाची माफी मागणार आहात? असा सवाल ठाकरेंनी केला.

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले, महाराष्ट्रात जे काही वातावरण चाललंय ते राजकारण नसून गजकारण आहे. पण या चुकीला माफी नाही, त्यामुळे आज आपल्या मनातील संताप व्यक्त करण्यासाठी हे ठिकाणं निवडलंय. गेट वे ऑफ इंडिया… पण आज शिवछत्रपतींच्या साक्षीने बेकायदेशीररित्या बसलेल्या सरकारला गेट आऊट ऑफ इंडिया, असे ही जनता म्हणत आहे म्हणूनच आम्ही इथे जमलो आहोत. ४ दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याप्रकरणी माफी मागितली. पण माफी मागितली नसती तर या राज्याने तुम्हाला ठेवलं तरी असत का? माफी मागताना सुद्धा मोदींच्या चेहऱ्यावर मग्रुरी होती, ती माफी आम्हाला मान्य नाही. असं ठाकरे यांनी म्हंटल.

मोदींनी माफी कशासाठी मागितली? महाराजांचा पुतळा पडला म्हणून माफी मागितली? कि पुतळा उभारताना भ्रष्टाचार झाला म्हणून माफी मागितली? कि भ्रष्टाचारावर पांघरून घालण्यासाठी माफी मागितली असा थेट सवाल उद्धव ठाकरेंनी केला. लोकसभा निवडणुकीआधी तुम्ही घाईघाईत, भ्रष्टाचार करुन महाराजांचा पुतळा बसवण्याची काही गरज नव्हती. निवडणुकीपूर्वी मोदी म्हणायचे ये मोदी गॅरेंटी है.. हीच ती मोदींची गॅरेंटी जिथे हात लावेन तिथे सत्यानाश होईल. तुम्ही कशा कशाची माफी मागणार? घाईगडबडीत बांधलेलं संसद भवन आणि राम मंदिर गळतंय त्याची माफी मागणार? असा प्रश्न करत उद्धव ठाकरेंनी मोदींवर घणाघात केला. हा शिवप्रेमींचा महाराष्ट्र आहे, मग्रुरीने माफी मागून चालणार नाही, हा महाराष्ट्र धर्माचा अपमान आहे, आणि छत्रपतींचा अपमान महाराष्ट्र कधीच सहन करत नाही असं उद्धव ठाकरे यांनी म्हंटल.