हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) याना सर्वात मोठा इशारा दिला आहे. आता एकतर तू तरी राहशील, नाहीतर मी असं म्हणत ठाकरेंनी फडणवीसांना आव्हान दिले आहे. मुंबईतील रंगशारदा सभागृहात झालेल्या ठाकरे गटाच्या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस यांच्यासहित भाजपवर तुफान हल्लाबोल चढवला. उद्धव ठाकरेंनी थेट आरपारची भूमिका घेतल्याने आगामी काळात भाजप विरुद्ध उद्धव ठाकरे असा सामना रंगण्याची शक्यता आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले, अनिल देशमुखांनी सांगितलं की, कसं मला आणि आदित्यला तुरुंगात टाकण्यासाठी या फडणवीसाचे डाव होते. हे सगळं सहन करुन मी हिंमतीने उभा राहिलेलो आहे. आता एकतर तू तरी राहशील नाहीतर मी तरी राहीन. अजूनही माझ्याकडे अधिकृत पक्ष, चिन्ह आणि पैसा नाही. पण मी केवळ तुमच्या ताकदीवर या सगळ्यांना आव्हान देत आहे. मी म्हणजे मी नाही, तुम्ही सगळे आहात. दिल्लीच्या छातीत उद्धव ठाकरेची नाही तुमची धडकी भरली आहे असं म्हणत उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांना खुलं आव्हान दिले आहे.
यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही समाचार घेतला. जोपर्यंत आपण सरळ होतो, तोपर्यंत सरळ असतो. पण एकदा वाकड्यात घुसलो की आपण वाकडं करतो. शिवसेना ही गंजलेली तलवार नाही, तर तळपती तलवार आहे तर भाजप म्हणजे चोर माणसं, राजकारणातील षंढ माणसं आहे. लोकसभा निवडणुकीत आपण असा नडलो की मोदींना घाम फोडला. नरेंद्र मोदींचे भाषण बघताना आता किव येते, मी कधी नगरसेवक झालो नव्हतो, थेट मुख्यमंत्री झालो. जे जे शक्य होतं, ते सगळं मी केले हे आपल्यासाठी शेवटचं आव्हान आहे. त्यानंतर आपल्याला आव्हान देणार कोणी राहणार नाही असं उद्धव ठाकरेंनी म्हंटल. तरीही अजून कोणाला जायचं असेल तर उघडपणे जा आणि आत राहून दगाबाजी करु नका. शिवसैनिकांना सोबत घेऊन मी पुन्हा एकदा लढून आणि जिंकून दाखवीन असा निश्चय उद्धव ठाकरेंनी केला.