‘माझं घड्याळाचं दुकान नाही मात्र घड्याळवाले माझे पार्टनर आहेत’- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे प्रतिनिधी । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काल बारामती दौऱ्यावर होते. बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्रात अ‍ॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट आणि कृषी विकास केंद्र बारामती यांच्यातर्फे माळेगाव येथे भरविण्यात आलेल्या ‘कृषिक २०२०’ या प्रदर्शनाचे उद्घाटन ठाकरे यांच्या हस्ते झाले. या उदघाटनावेळी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, कृषिमंत्री दादा भुसे, प्रसिद्ध अभिनेते आमीर खान पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसायमंत्री सुनील केदार आणि बारामती कृषी विकास प्रतिष्ठानचे राजेंद्र पवार या वेळी उपस्थित होते.

दरम्यान खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक मिश्किल प्रश्न केला होता. त्यावर उद्धव ठाकरे यांचेकडून तितक्याच मिश्कीलपणे उत्तर देण्यात आलं. बारामतीत भरलेल्या प्रदर्शनात बोलत असताना मुख्यमंत्री म्हणाले कि, ‘पवार साहेब मला सुप्रिया ताईंनी विचारलं की तुमचं घड्याळाचं दुकान आहे का? मी म्हटलं दुकान नाही. मात्र, घड्याळवाले माझे पार्टनर आहेत.’ मुख्यमंत्री ठाकरेंच्या या मिश्किल वक्तव्यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, काही चांगल्या गोष्टी घडण्यासाठी वेळ जुळून यावी लागते. आता ती वेळ जुळून आली आहे. महाराष्ट्रात अगदी योग्य वेळी आपली सत्ता आली आहे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं. यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी शरद पवार यांच्या बारामतीमधल्या कामाची प्रशंसा केली. मी जर बारामतीला आलो नसतो तर चांगल्या कृषी प्रदर्शनाला मुकलो असतो. कुणालाही पाहून अभिमान वाटावे असेच हे कृषी प्रदर्शन आहे. नवीन शेती तंत्रज्ञान कार्य पद्धतीचा वापर करून शेती उत्पादन वाढीचे महत्त्व पटवून देण्यासाठी पवार कुटुंबीयांनी उत्तम कार्य केले आहे.