सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
आज शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे हे पश्चिम महाराष्ट्राच्या दौ-यावर आहेत. सांगली व सातारा जिल्ह्यातील अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतांची पाहणीसाठी ते दाखल झाले आहेत. सातारा जिल्ह्यातील मायणी कातरखटाव या भागातील दाक्ष,बाजरीच्या पिकांची त्यांनी पाहणी केली.
यावेळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी त्यांनी संवाद साधला. ते म्हणाले कि, ‘ तुम्हाला कोणी वाली नाही असं समजू नका. सत्तास्थापन करणं हा भाग वेगळा आहे. मात्र, एका भागात जर एवढे नुकसान झाले असेल तर राज्यात किती नुकसान झाले असेल याची मला कल्पना आहे. तेव्हा अशा संकटात तुमचा सातबारा कोरा करण्याचं मी वाचन देतो. आणि शिवसेनाप्रमुख म्हणून मी हे वचन पूर्ण करणारच.’ असं आश्वासन उद्धव यांनी यावेळी दिलं. त्याचबरोबर शिवसेना शेतकऱ्यांसाठी मदत केंद्रे सुरू करणार आहे. तुम्ही खचून जाऊ नका आणि आत्महत्येचा विचारही मनात आणू नका शिवसेना तुमच्या पाठीशी आहे. असेही ते म्हणाले.
या दौऱ्यात उद्धव यांनी काटेवाडी गावातील दादासाहेब कोरडे यांच्या खराब झालेल्या आल्याच्या शेताची पाहणी केली. यावेळी येथील शेतकऱ्यांशी सुद्धा त्यांनी संवाद साधला.येथे बोलतांना त्यांनी पंतप्रधान योजनेचे सहा हजार रुपये कोणा-कोणाला मिळाले? असं विचारात भाजप सरकार वर टीका केली. तसेच दुष्काळी अनुदानाचे पैसे अजूनही मिळाले नसताना, कोणत्याही अटी-नियम, निकष न लावता नुकसान भरपाई मिळवून देण्याचे शर्थीचे प्रयन्त मी करेल असं वाचन त्यांनी यावेळी दिलं.