मुंबई प्रतिनिधी | शिवाजी पार्कवरील न भूतो न भविष्यती अशा गर्दीला संबोधत, छत्रपती शिवाजी महाराज आणि आई वडिलांना स्मरून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची गुरुवारी सायंकाळी ६ वाजून ४३ मिनिटांनी शपथ घेतली.
शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसला सोबत घेत महाविकासआघाडीचा मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी ही शपथ घेतली. दिग्गजांच्या उपस्थितीत फटाक्यांच्या आतिषबाजीत राज्यपाल भगतसिंह कोषयारी यांनी उद्धव यांना ही शपथ दिली.
भगव्या रंगाचा पोशाख परिधान केलेल्या उद्धव यांनी शपथविधीनंतर व्यासपीठावरच माथा टेकून जनतेला अभिवादन केलं. शिवाजी पार्कवर पहिल्यांदाच तीन पक्षांच्या झेंड्यांची आणि लोकांची अलोट गर्दी जमली होती. उद्धव ठाकरे यांच्यानंतर एकनाथ शिंदे आणि सुभाष देसाई यांनीही लगेच मंत्रिपदाची शपथ घेतली. यावेळी शरद पवार, कमलनाथ, अभिषेक मनू सिंघवी, राज ठाकरे, सुप्रिया सुळे, वेणूगोपाल आणि इतर नेते उपस्थित होते.