नवी दिल्ली । कोरोनाचा प्रादुर्भाव तसेच लॉकडाऊनमुळे स्थगित करण्यात आलेली UGC NET 2020 परीक्षा कधी होणार हा प्रश्न अनेकांना सतावत आहे. या परीक्षेला लाखो उमेदवारांनी अर्ज केला आहे. मात्र, सध्या केंद्र सरकार या परीक्षेबाबत नेमका निर्णय काय घेते याकडे सर्व परीक्षार्थी डोळे लावून बसले आहेत. दरम्यान, केंद्रीय मनुष्यबळ मंत्री डॉ. रमेश पोखरियाल यांनी याबाबत आज एक महत्वाची माहिती दिली आहे.
डॉ. पोखरियाल यांनी आज गुरुवारी १४ मे रोजी देशभरातील शिक्षकांशी एका वेबिनारद्वारे संवाद साधला. त्यात त्यांनी यूजीसी नेट परीक्षेसंदर्भात चर्चा केली. या वेबिनारमध्ये देशातील विविध भागातून शाळा-महाविद्यालयांच्या शिक्षकांनी मंत्रीमहोदयांना अनेक प्रश्न विचारले. त्यापैकी काही जणांनी यूजीसी नेट परीक्षेची तारीख कधी जाहीर होणार याबाबत त्यांना प्रश्न केला.
यावर केंद्रीय मंत्र्यांनी उत्तरादाखल सांगितले की, ‘पुढील काही दिवसांतच विद्यापीठ अनुदान आयोगाच्या अधिकाऱ्यांची मी बैठक घेणार आहे. या बैठकीत यूजीसी नेट परीक्षेच्या तारखेबाबत निर्णय घेण्यात येईल.’ लवकरच या परीक्षेच्या तारखेचीही घोषणा केली जाईल असं त्यांनी सांगितलं. यूजीसी नेट २०२० साठी अर्ज करण्याची प्रक्रिया अजूनही सुरू आहे. अर्ज करण्याची अखेरची तारीख १६ मे २०२० आहे. ही परीक्षा नॅशनल टेस्ट एजन्सीद्वारे आयोजित केली जाते. विद्यापीठ तसेच महाविद्यालयांमधील असिस्टंट प्रोफेसर किंवा रिसर्च फेलोशीपसाठी या परीक्षेतील यशामुळे संधी मिळते.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”