उजनी पाणीप्रश्न ः महाराष्ट्र दिनी जलाशयातच आंदोलन 

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सोलापूर | वेळ प्रसंगी आम्ही पाण्यात पोहून मरू, मात्र हक्काचे पाणी देणार नाही अशी भूमिका प्रभाकर देशमुख यांनी घेतल्यामुळे प्रशासनापुढे मोठा पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे उन्हाळ्यात उजनीचा पाणीप्रश्न पेटला असल्याचे महाराष्ट्रदिनी (1 मे) पहायला मिळाले.

पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी उजनीतील पाच टीएमसी पाणी इंदापूर तालुक्‍यासाठी पळविले, याच्या निषेधार्थ व तो निर्णय रद्द व्हावा यासाठी जनहित शेतकरी संघटना, प्रहार संघटनेने शनिवारी (1 मे) महाराष्ट्रदिनी उजनी जलाशयातच आंदोलन सुरू केले आहे. जोपर्यंत जिल्हाधिकारी किंवा पालकमंत्री येऊन निर्णय रद्द केला असल्याचे सांगत नाहीत, तोपर्यंत पाण्याबाहेर येणार नाही.

दरम्यान, सात वाजेपर्यंत जिल्हाधिकारी किंवा पालकमंत्री येऊन निर्णय घेत नाहीत तोपर्यंत पाण्यातच राहणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले. वेळ प्रसंगी आम्ही पाण्यात पोहून मरू मात्र हक्काचे पाणी देणार नाही, अशी ठोस भूमिका देशमुख यांनी घेतली आहे. दरम्यान, या पळविलेल्या पाण्याचा कारखानदारीवरही मोठा परिणाम होणार आहे, कारण पाणी नसल्यामुळे उसाचे क्षेत्र कमी होणार आहे. परिणामी शेतकरी व कारखानदारांचे मोठे नुकसान होणार आहे. सत्ताधारी आमदारांनी राजकारणाचे जोडे बाजूला ठेवून या संघर्षात सहभाग नोंदवावा, असे आवाहनही देशमुख यांनी या वेळी केले.

या आंदोलनात देशमुख यांच्यासह “प्रहार’चे अतुल खुपसे, संजय बाबा कोकाटे, माऊली हळवणकर, बळिराजा शेतकरी संघटना, रयत क्रांती संघटना, जनशक्ती संघटना पस्तीस गावे उपसा सिंचन संघर्ष समिती, बापू मेटकरी, माऊली जवळेकर व कार्यकर्ते सहभागी झाले आहेत.