सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे
विधानसभा निवडणुकीत भाजप शिवसेनेला शह देण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी मनसेसह सर्व राजकीय पक्षांनी सरकारविरोधात मोट बांधली पाहिजे. महाआघाडी साठी स्वाभिमानी शेतकरी पक्ष प्रयत्नशील असून आघाडीसाठी 1 ऑगस्टपर्यंत वाट पाहू, अन्यथा स्वतंत्र लढण्यात येईल, असा अल्टिमेटम स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी यांनी सांगलीतील पत्रकार परिषदेत दिला.
स्वाभिमानीचे ४९ उमेदवार तयार आहेत. लोकसभा निवडणुकीत वंचितमुळे नुकसान झाले. अजूनही वेळ गेलेली नाही, त्यामुळे प्रकाश आंबेडकरांनी महाआघाडीत सामील व्हावे, असे आवाहनही शेट्टींनी केले. सांगली मध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्शवभूमीवर राजू शेट्टी यांनी कार्यकर्त्यांची बैठक घेतली. यावेळी बोलताना राजू शेट्टी म्हणाले, लोकसभा निवडणुका या भावनेच्या मुद्द्यावर लढल्या गेल्या. राष्ट्रवाद, धर्मवाद हे मुद्दे लोकांना महत्वाचे वाटले. आता निवडणूक झाल्यावर लोकांना कळलं की देशात बेरोजगारी वाढलेली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी काही महिन्यांचा अवधी आहे काँग्रेस-राष्ट्रवादी मनसेसह सर्व राजकीय पक्षांनी भाजप सेनेला शह देण्यासाठी एकत्र आले पाहिजे.
स्वाभिमानी शेतकरी पक्षाने विधानसभेचे ४९ जागा लढवण्याचा निर्णय घेतला आहे. आमचे उमेदवार तयार आहेत, मात्र सेना भाजपला पराभूत करण्यासाठी राजकीय पक्षांना आव्हान देणे गरजेचे आहे. त्यासाठी १ ऑगस्टपर्यंत महाआघाडीसाठी आम्ही अल्टिमेटम देत आहोत. एकत्र लढण्याचा निर्णय झाल्यास जागा कमी जास्त लढवण्याची स्वाभिमानीची तयारी आहे. लोकसभा निवडणुकीस वंचित आघाडी मुळे महाआघाडीचे नुकसान झाले. वंचित आघाडीच्या सर्व नेत्यांनी एकत्र बसून महाआघाडीमध्ये येण्याबाबतचा निर्णय घ्यावा. अजूनही वेळ गेलेली नाही. विधानसभेला नुकसान टाळावे केवळ निवडणुका लढवून चालणार नाही, त्या जागा ही मिळाल्या पाहिजेत। त्यामुळे प्रकाश आंबेडकरांनी याबाबतचा निर्णय घेउन महाआघाडीमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहनही शेट्टी यांनी केले.