हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| जंक फूड खाल्ल्यामुळे आरोग्याला धोका निर्माण होतो, जंग फूड शरीरासाठी चांगले नसते हे आजवर कित्येक वेळा आपल्याला डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहे. मात्र आता याच जंक फूडमुळे ३२ प्रकारच्या गंभीर आजारांचा धोका देखील उद्भवू शकतो, अशी धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आणि इंडियन कौन्सिल फॉर रिसर्च ऑन इंटरनॅशनल इकॉनॉमिक रिलेशन्स यांनी नुकताच यासंदर्भात एक अहवाल सादर केला आहे. या अहवालातूनच अल्ट्रा – प्रोसेस फुडच्या (Ultra-Processed Food) सेवनामुळे 32 प्रकारचे गंभीर आजार उद्भवू शकतात, हे सांगितले गेले आहे.
अल्ट्रा-प्रोसेस प्रक्रिया केलेल्या अनेक पदार्थांमध्ये वेगवेगळे रसायने वापरली जातात. तसेच यामध्ये रंग, इमल्सीफायर्स, फ्लेवर्स इतर घटकांचा देखील समावेश असतो. अल्ट्रा-प्रोसेस मध्ये अनेक विविध प्रकारचे म्हणजेच स्नॅक्स, कार्बोनेटेड पेये, साखरयुक्त तृणधान्ये आणि रेडी टू इट असे पदार्थ असतात. या पदार्थांमध्ये फायबरचे प्रमाण सर्वात कमी असते. तर साखर फॅट किंवा मीठाचे प्रमाण सर्वाधिक आढळून येते. याचा माणसाच्या आरोग्यावर चांगला परिणाम होत नाही.
मुख्य म्हणजे, अल्ट्रा – प्रोसेस फुडला धरूनच The BMJ ने संशोधन केले आहे. या संशोधनाच्या माध्यमातून त्यांनी 10 लाख नागरिकांच्या आरोग्याचा अभ्यास केला. ज्यातूनच अति प्रमाणात अल्ट्रा – प्रोसेस फुडचे सेवन केल्यास 32 प्रकारच्या गंभीर आजारांचा धोका उद्भवू शकतो, हे समोर आले आहे. अतिप्रक्रिया करण्यात आलेले अन्न हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले ठरू शकत नाही. महत्वाचे म्हणजे, यामुळे मृत्यूचा धोका सुमारे 50 टक्क्यांनी वाढतो. याबरोबर, चिंता करणे, मानसिक आजार, मदुमेहाचा धोका ही 12 टक्क्यांनी वाढतो. ही बाब देखील निदर्शनास आली आहे.