Wednesday, October 5, 2022

Buy now

उंब्रज पोलिस स्टेशनच्या गृहरक्षकाचा प्रामाणिकपणा; हरवलेला मोबाईल, कागदपत्रे केली परत

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके

आजच्या काळातही अनेकजण आपले काम प्रामाणिक आणि तत्परतेने करत असतात. अशाच एका कार्यतत्पर कर्मचाऱ्याच्या प्रामाणिकपणाचे दर्शन घडले. एका महिलेची हरवलेली पर्स व त्यातील पैसे, मोबाईल हे होमगार्ड म्हणून काम करत असलेल्या विनायक कुंभार या कर्मचाऱ्याने शोधून परत केली.

याबाबत अधिक माहिती अशी कि, रविवार दिं. 06 रोजी सकाळी कराड तालुक्यातील किवळ येथील सुवर्णा साळुंखे यांची कराड ते उंब्रज प्रवास करताना त्यांची पर्स गाडीतून खाली पडली. त्या जेव्हा उंब्रज येथील पाटण तिकाटणे येथे आल्या असता त्या गाडीतून उतरल्या तेव्हा त्यांना आपली पर्स पडल्याचे लक्षात आले. त्या पर्समध्ये मोबाइल, महत्त्वाची कागदपत्रे व काही रक्कम होती. त्यांनी तत्काळ उंब्रज येथील पोलीस स्टेशनमध्ये जाऊन उंब्रज पोलीस स्टेशनचे सहा. पोलीस निरीक्षक अजय गोरड यांना याबाबतची माहिती दिली.

मिळालेल्या माहितीनंतर अधिकारी गोरड यांनी उंब्रज येथील पाटण तिकाटाने येथे ट्रॅफिक डुटीसाठी उपस्थीत असलेल्या होमगार्ड कर्मचारी विनायक कुंभार यांना याबाबतची माहिती दिली. कर्मचारी कुंभार यांनीही लगेच शोध मोहीम राबविली. त्यांनी संबंधित महिला ज्या गाडीतून उंब्रज येथे आलया होत्या. त्या गाडी आलेल्या दिशेने शोध घेतला. त्यांना मसूर फाटा येथे एक 1 पर्स मिळून आली.

पर्स मधील सर्व ऐवज तपासून पाहत कुंभार यांनी ती पर्स सुवर्णा साळुंखे यांचीच असल्याची खात्री करून त्यांच्या ताब्यात दिली. हरवलेली पर्स काही तासातच शोधून दिल्याबद्दल उंब्रज पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड यांनी कर्मचारी कुंभार यांच्या प्रामाणिकपणा बद्दल त्यांचे अभिनंदन केले.