औरंगाबाद – शहराला मंगळवारी रात्री धुवाधार पावसाने झोडपल्याने अवघ्या एकाच तासात ११६ मि.मी. पावसाची नोंद झाली. या पावसामुळे शहरातील अनेक सखल भागात पाणी साचले. त्यातच मुकुंदवाडी भागातील रस्त्यांना नाल्याचे स्वरुप आले होत. या रस्त्यावरुन वाहणा-या पाण्यात कंपनीतून घराकडे जाणा-या दोघी वाहून गेल्या. त्यातच एकीचा पाण्यात बुडून दुर्दैवी अंत झाला. तर दुसरी सुदैवाने बचावली. या घटनेमुळे मुकुंदवाडी भागात संतापाची लाट पसरली आहे. बुधवारी दुपारपर्यंत महापालिका आणि पोलिसांकडून साधा पंचनामा करण्यात आला नव्हता. त्यामुळे संतप्त जमावाने आंदोलनाला सुरुवात केली. मुकुंदवाडीतील रेल्वे गेट क्र. ५६ जवळ मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास ही घटना घडली.
शेंद्रा एमआयडीसीतील धुत ट्रान्समिशन कंपनीत रुपाली दादाराव गायकवाड (२१) आणि आम्रपाली रघुनाथ म्हस्के (१८, दोघीही रा. राजनगर, मुकुंदवाडी) कामाला आहेत. मंगळवारी रात्री आठच्या सुमारास काम संपल्यावर दोघीही घराकडे निघाल्या. त्याचदरम्यान शहरात जोरदार पावसाला सुरुवात झाली. काही वेळातच सगळीकडे पाणीच पाणी झाले. रस्त्याला नदी, नाल्याचे स्वरुप आले होते. रात्री साडेआठच्या सुमारास रुपाली आणि आम्रपाली मुकुंदनगरहून रेल्वे पटरी ओलांडून राजनगरकडे जात होत्या. रेल्वे गेट क्र. ५६ जवळून जात असताना रुपाली पुढे तर आम्रपाली तिच्या मागे होती. नेहमीचा रस्ता असल्यामुळे रुपालीने रस्ता समजून पाण्यात पाय ठेवला. मात्र, अतिवृष्टीमुळे रस्ता आधीच वाहून गेला होता. त्यामुळे तेथे भला मोठा खड्डा पडला होता. या खड्ड्यात रुपालीचा पाय पडला. तेवढ्यात तिच्या मागे असलेली आम्रपाली देखील त्याच खड्ड्यात पडली. यात रुपाली वाहून जात असताना आम्रपालीने काही अंतरावर एका झाडाला पकडले होते. रुपाली वाहून जात असल्याचे पाहून आम्रपालीने आरडाओरड केली. त्यामुळे परिसातील नागरिकांनी धाव घेतली. स्थानिक नागरिकांनी तातडीने रुपालीचा शोध घेतला. काही अंतरावरुन त्यांनी रुपालीला बाहेर काढले. त्यानंतर तिला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतू डॉक्टरांनी तिला मृत घोषीत केले.
पंचनामा न केल्याने नातेवाईकांचा संताप
बुधवारी दुपारपर्यंत साधा पंचनामा करण्यासाठी पोलीस अथवा मनपाचे अधिकारी आले नाही. त्यामुळे संतप्त नातेवाईकांनी रुपालीचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. बहुजन समाज पार्टीचे प्रदेश सचिव सचिन बनसोडे, जिल्हा सचिव अमोल पवार, राहुल निकम, पूर्व संघटनमंत्री सिराज शेख, विष्णू वाघमारे, प्रल्हाद तारु यांच्यासह नागरिकांनी मुकुंदनगर भागात आंदोलनाला सुरुवात केली.
आश्वासनानंतर ताब्यात घेतला मृतदेह
आंदोलनाला सुरुवात झाल्याची माहिती मिळाल्यावर मुकुंदवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मनोज पगारे, दुय्यम निरीक्षक ब्रह्मा गिरी यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी मनपाने कुठल्याही सुविधा न दिल्यामुळेच ही घटना घडल्याचा आरोप जमावाने केला. अखेर मनपाचे वार्ड अधिकारी श्रीधर तारपे यांनी या भागातील रस्ते बनविणे आणि रुपालीच्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर बुधवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले.